मनपा : पारंपरिक कामांमध्येच रस, अंतर्गत कलह‘ध्येयनामा’चे भाजपाला विस्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:19 IST2017-11-13T00:17:39+5:302017-11-13T00:19:21+5:30
महापालिकेत तब्बल ६६ जागा जिंकत सत्तारूढ झालेल्या भाजपाला निवडणूक काळात जाहीर केलेल्या ‘ध्येयनामा’तील आपल्याच वचनांचे विस्मरण झाले आहे.

मनपा : पारंपरिक कामांमध्येच रस, अंतर्गत कलह‘ध्येयनामा’चे भाजपाला विस्मरण
नाशिक : महापालिकेत तब्बल ६६ जागा जिंकत सत्तारूढ झालेल्या भाजपाला निवडणूक काळात जाहीर केलेल्या ‘ध्येयनामा’तील आपल्याच वचनांचे विस्मरण झाले आहे. सत्तेत येऊन दहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी एकही नावीन्यपूर्ण योजनेला चालना तर दूरच, साधा प्रस्तावही तयार होऊ शकलेला नाही. याउलट, रस्ते विकासासारख्या पारंपरिक कामांमध्येच अधिक स्वारस्य दाखविले जात आहे. त्यातच पहिल्यांदा एकहाती सत्ता प्राप्त झाल्याने नेत्यांमधील महत्त्वाकांक्षा उफाळून आल्या असून, अंतर्गत कलहाने पक्षाला ग्रासले आहे.
फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या नाशिक महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाने आपला ‘ध्येयनामा’ जाहीर केला होता. त्यासाठी भाजपाच्या संकेतस्थळावर नागरिकांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्याला शहरातील ४३ हजार ६७७ नागरिकांनी प्रतिसाद दिला होता.
नागरिकांच्या सूचनांवरून प्रकाशित करण्यात आलेल्या ध्येयनाम्यात नाना-नानी पार्क उभारणार, ग्रीन जीम, उड्डाणपूल, शहरात सीसीटीव्ही, जलवाहिन्या बदलणे, महिलांचे बचत गट सुरू करणे अशा नेहमीच्याच संकल्पना मांडण्यात आल्या होत्या. शिवाय, मनपा रुग्णालयात जन्मास येणाºया मुलीच्या नावे पाच हजार रुपये डिपॉजीट करणे, महिलांच्या अडचणींसाठी समुपदेशन केंद्र, विकासकामांच्या निविदांच्या अंतिम देयकांसंदर्भात सर्व कागदपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे, सॅनेटरी नॅपकिनची डिस्पोजल सिस्टीम बसविणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर रूफ असेल तर घरपट्टीवर असणारी पाच टक्के सवलत दहा टक्केकरणे, कौशल विकास केंद्र उभारणे, वाराणसीच्या धर्तीवर गोदावरी पूजन, आनंदवल्ली ते मानूर घाटापर्यंत स्वच्छतेचे स्वतंत्र केंद्र, गोदाकाठी सांस्कृतिक महोत्सव, क्रीडा प्रबोधिनी, शहीद स्मारके उभारणी या काही नावीन्यपूर्ण योजनांचाही समावेश करण्यात आला होता. त्याचबरोबर, नाशिकच्या औद्योगिक वाढीसाठी स्वतंत्र औद्योगिक प्राधीकरण करणे, नाशिकमधून राष्टय व आंतरराष्टÑीय विमान सेवा सुरू करणे, स्वंतत्र वैद्यकीय महाविद्यालय आणि सहाशे खाटांचे रुग्णालय सुरू करणे, कायदा व सुव्यवस्थेची कठोर अंमलबजावणी करणे, गुंडगिरीला आळा घालून अवैध धंद्यांचा बंदोबस्त करणे, नाशिक शहरात पोलिसांची गस्त वाढवणे, अशा महापालिकेच्या अखत्यारित नसलेल्या अनेक अफलांतून योजना त्यात मांडण्यात आल्या होत्या. नाशिकला आयटी हब तसेच देश-विदेशांतील उद्योगांसाठी आंतरराष्टÑीय कन्व्हकेशन सेंटर उभे करणार, महापालिकेची पर्यावरणपूरक बससेवा तसेच ई-रिक्षा सुरू करणे, तपोवनात पाचशे खोल्यांचे पर्यटन विकास तसेच आदिवासी संस्कृती संवर्धनासाठी पर्यटन केंद्र अशा महत्त्वाकांक्षी योजनांचाही समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर योजनांचे वचन भाजपाने दिले परंतु, आता सत्तेत येऊन वर्ष पूर्ण व्हायची वेळ आली तरी यातील एकही योजनेला चालना देण्यात सत्ताधाºयांना यश आलेले नाही.