मनपा, पोलीस प्रशासनाची वक्रदृष्टी
By Admin | Updated: September 20, 2015 00:04 IST2015-09-20T00:01:14+5:302015-09-20T00:04:14+5:30
मालेगाव : करवसुली, दडपशाहीमुळे गणेशभक्तांत नाराजी

मनपा, पोलीस प्रशासनाची वक्रदृष्टी
मालेगाव : येथील महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर वक्रद्ृष्टी केली आहे. दोन्ही प्रशासकीय संस्थांकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर दडपशाही केली जात असून, अवास्तव करवसुलीही सुरू आहे. त्यामुळे शहरातील गणेशभक्तांमध्ये मनपा व पोलीस प्रशासनाविषयी तीव्र नाराजी आहे.मालेगाव शहरात यंदाच्या गणेशोत्सवात जवळपास ३००हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. दुष्काळाचे सावट असतानादेखील बहुसंख्य श्रीगणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे स्वत: पदरमोड करून श्रीगणेशोत्सव साजरा करत आहेत. मात्र याची कुठलीही तमा न बाळगता मनपा प्रशासनाने शहरातील सर्वच छोट्या-मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून कररूपात तब्बल आठशे रुपयांची वसुली मोहीम सुरू केली आहे. ही करवसुली बहुसंख्य मंडळांना जिझिया करासारखी वाटत आहे. काही मंडळाची श्रीगणेशाची मूर्ती पाचशे रुपयांची असून, इतर खर्च आहे. त्यांना आठशे रुपयांचा कर भरणे दुरापास्त होत आहे. विशेष म्हणजे मनपाने ही करवसुली करून देण्यासाठी पोलिसांनी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष सहकार्य करावे, अशी मनपा प्रशासनाची सूचना आहे. त्यासाठी राज्य उच्च न्यायालयाचा हवाला दिला जात आहे. प्रामुख्याने रस्त्यावर मंडप उभारणाऱ्या मंडळांना या गोष्टीचा सर्वाधिक त्रास होत आहे. (प्रतिनिधी)