सफाई कामगारांच्या शिष्टमंडळाशी मनपा आयुक्तांची खडाजंगी
By Admin | Updated: February 9, 2016 00:22 IST2016-02-09T00:21:53+5:302016-02-09T00:22:19+5:30
पालिकेत तणाव : नेत्यांच्या मध्यस्तीनंतर दिलजमाई

सफाई कामगारांच्या शिष्टमंडळाशी मनपा आयुक्तांची खडाजंगी
नाशिक : महापालिकेतील सफाई कामगारांना मोबाइल अॅपद्वारे हजेरी पद्धत लागू करू नये, या मागणीचे निवेदन घेऊन गेलेले बाल्मीकी, मेघवाळ, मेहतर समाज संघर्ष समितीचे शिष्टमंडळ आणि आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यात खडाजंगी होऊन काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यातच आयुक्तांनी पोलिसांना पाचारण केल्याने तणावात आणखीच भर पडली. अखेर, कॉँग्रेसच्या नेत्यांनी महापालिकेत धाव घेत आयुक्तांशी चर्चा करत दिलजमाई घडवून आणली.
महापालिकेच्या सफाई कामगारांची मोबाइल अॅपद्वारे हजेरी घेण्याची पद्धत लागू करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. सदर पद्धत लागू करू नये, या मागणीचे निवेदन घेऊन बाल्मीकी, मेघवाळ, मेहतर समाज संघर्ष समितीचे पदाधिकारी सुरेश दलोड, सुरेश मारू यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आयुक्तांकडे गेले. शिष्टमंडळाने निवेदन दिल्यानंतर आयुक्तांनी हजेरी पद्धतीची मागणी सोडून अन्य विषयांवर बोला, असे सांगितले आणि वादाला सुरुवात झाली. शिष्टमंडळाने शासनाच्या नियमानुसार कामगारांना आधी सेवा-सुविधा पुरवा मगच हजेरी पद्धत लागू करा, असा आग्रह धरला. परंतु आयुक्त हजेरी पद्धतीवर ठाम राहिले. वाद वाढत असल्याचे पाहताच आयुक्तांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. त्यामुळे सफाई कामगारांचे शिष्टमंडळ बिथरले आणि त्यांनी आयुक्तांच्या या वर्तणुकीचा निषेध केला. संघटनेचे नेते सुरेश मारू व सुरेश दलोड यांनी पोलिसांना पाहून कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दूरध्वनी करून महापालिका मुख्यालयात बोलावून घेतले. त्यातच पन्नासेक सफाई कामगारही जमा झाल्याने महापालिका मुख्यालयात तणावाची स्थिती निर्माण झाली. थोड्याच वेळात कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, नगरसेवक उद्धव निमसे महापालिकेत आले. त्यांनी आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. नेत्यांनी शिष्टमंडळाला आयुक्तांकडे घेऊन जात त्यांच्यात चर्चा घडवून आणली. आयुक्तांनी सदर हजेरी पद्धत प्रायोगिक तत्त्वावर लागू करणार असल्याचे आणि अन्य मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिष्टमंडळाचे समाधान झाले आणि तणावाची स्थिती निवळली. (प्रतिनिधी)