उद्यान देखभालीसाठी निविदाप्रक्रिया

By Admin | Updated: May 8, 2016 23:52 IST2016-05-08T23:29:06+5:302016-05-08T23:52:44+5:30

कार्यवाही सुरू : २८६ उद्यानांसाठी देणार ठेका

Niwdeprotection for garden maintenance | उद्यान देखभालीसाठी निविदाप्रक्रिया

उद्यान देखभालीसाठी निविदाप्रक्रिया

नाशिक : गेल्या दीड वर्षापासून भिजत पडलेल्या उद्यान देखभालीचा ठेका देण्यासाठी अखेर निविदाप्रक्रिया महापालिकेने सुरू केली असून, २८६ उद्यानांसाठी निविदा काढल्या जाणार आहेत. प्रशासनाने निविदेतील काही अटी-शर्ती शिथिल करत केवळ महिला बचत गटांनाच नव्हे तर सर्वांनाच प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
शहरातील उद्यानांच्या देखभालीचा ठेका देण्यासाठी सर्वप्रथम आयुक्तांनी महासभेत प्रस्ताव ठेवला होता, परंतु एकाच ठेकेदाराला काम न देता महिला बचत गटांना ठेका देण्याचा निर्णय महासभेने दिला होता. त्यानुसार, प्रशासनाने दोन वेळा निविदाप्रक्रिया राबविली, परंतु अटी-शर्ती पूर्ण करू शकत नसल्याने महिला बचत गटांनी त्याकडे पाठ फिरविली होती.
पहिल्यावेळी केवळ ३६ बचत गटांनी प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आयुक्तांनी अटी-शर्तींमध्ये बदल करत पुन्हा निविदाप्रक्रिया राबवली, परंतु त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बरेच दिवस सदर प्रश्न भिजत पडला होता. अखेर स्थायी समिती सभापती सलीम शेख यांनी पुढाकार घेत महापौर व आयुक्तांना अटी-शर्तींमध्ये बदल करण्याची विनंती केली. त्यानुसार महापौरांनी खासगी ठेकेदाराने किमान ६० टक्के महिलांना संधी देण्याची अट टाकत निविदाप्रक्रिया राबविण्यास संमती दिली. आता प्रशासनाकडून निविदाप्रक्रिया राबविण्याची कार्यवाही सुरू झाली असून, दोन एकरच्यावर असलेल्या १५ उद्यानांसाठी स्वतंत्र निविदाप्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून अडकून पडलेल्या उद्यानांच्या देखभालीची कोंडी फुटणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Niwdeprotection for garden maintenance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.