निसाका भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता
By Admin | Updated: July 25, 2014 00:35 IST2014-07-24T23:35:51+5:302014-07-25T00:35:09+5:30
निसाका भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता

निसाका भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता
निफाड : निफाड सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी कृती समितीने पुणे येथे साखर आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. याप्रसंगी निसाका भाडेतत्त्वावर देण्यासाठी प्रस्ताव पाठविल्यास साखर संघाकडून मंजूरी दिली जाईल, असे आश्वासन साखर संघाचे आयुक्त सिंघल यांनी दिले. दरम्यान, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची समिती पदाधिकारी शुक्रवारी नाशिक येथे भेट घेणार आहे.
चांदोरी येथील देवराम निकम, शरद नाठे, दिलीप गडाख, नारायण खालकी, संपत गवाले, रखमा टर्ले, माधवराव तासकर यांनी पुणे येथे साखर संघ आयुक्त सिंघल यांना कारखाना सुरू करण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. निफाड कारखान्याची परिस्थिती, क्षेत्रात उपलब्ध ऊस, ऊस उत्पादक, कामगार यांची अर्थिक परिस्थिती अशा सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून निवेदन दिले. या निवेदनावर बोलताना आयुक्त सिंघल यांनी प्रस्ताव पाठवा तत्काळ मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन दिले. निसाकावरील दर महिन्याला दोन कोटी रुपयांचा बोजा थांबविण्यासाठी कारखाना अवसायनातून काढावा लागेल व त्यासाठी संचालक मंडळाचे राजीनामे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, निफाड येथे दि.२५ रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा व रास्ता रोको आंदोलन रद्द करण्यात आल्याची माहिती नाठे यांनी दिली. (वार्ताहर)