निफाड : बंद पडलेले निसाका-व रानवड कारखाने शासनदरबारी लवकर प्रयत्न करून कार्यान्वित करावे या मागणीचे निवेदन देऊन गोदाकाठच्या शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना साकडे घातले.निफाडमध्ये आढावा बैठकीसाठी आलेल्या भुसे यांनी निफाड सोसायटी येथे भेट दिली. याप्रसंगी करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके, माजी आमदार अनिल कदम व जिप अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी भेट घेऊन चर्चा केली.यावेळी निसाकासाठी शासन दरबारी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन भुसे यांनी शिष्टमंडळाला दिले. निवेदनात म्हटले आहे की, निफाड तालुक्यात साडेपाच हजार हेकटर पेक्षा अधिक ऊस उभा आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे उन्हाळ्यात रसवंतीगृहे बंद असल्याने उसाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात निफाडमध्ये ऊस उत्पादक शेतकर्यांच्याही आत्महत्या होऊ शकतात . त्यामुळे निसाका-रासाका कार्यान्वित होणे ही काळाजी गरज आहे. त्यासाठी शासन दरबारी आपण सहकार्य करावे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निसाका रासाका सुरू करण्याचा शब्द यापूर्वी दिलेला असल्याने आपण नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून पुढाकार घेऊन हे दोन्ही कारखाने चालू हंगामात सुरू करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच अधिक गाळप क्षमतेच्या निसाकाची मालमत्ता जप्त असल्याने शासनाने खास बाब म्हणून निसाकाच्या कर्जाची थकहमी घेऊन सदर कारखाना कार्यान्वित करावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सुधीर कराड, अनिल कुंदे, संजय कुंदे, विक्र म रंधवे, ललित गीते, कोठूरेचे सरपंच आशिष मोगल, पिंपळस-निसाकाचे सरपंच तानाजी पुरकर, रसलपुरचे संपत डुंबरे, भुसेचे दत्तू भुसारे, करंजगावचे सागर जाधव, राजेंद्र राजोळे, शिंगवेचे रामदास गीते, बाळासाहेब कानडे, रतन डेर्ले उपस्थित होते.
निसाका- रासाकासाठी गोदाकाठवासीयांचे कृषीमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 13:14 IST