निफाडला बिबट्या पकडला
By Admin | Updated: December 24, 2016 00:53 IST2016-12-24T00:52:50+5:302016-12-24T00:53:01+5:30
समाधान : वर्षभरात परिसरातून सोळा बिबटे पिंजऱ्यात

निफाडला बिबट्या पकडला
निफाड : येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज बिबट्याची मादी अडकली.
निफाड - सोनेवाडी रस्ता परिसरात शेती क्षेत्र आहे. या परिसरात १० ते १५ दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी ही घटना येवला वनविभागाला कळवली. वनविभागाने निफाड, सोनेवाडी परिसरातील शेतकरी मधुकर पुंजा ढेपले यांच्या शेतात दि. १७ डिसेंबर रोजी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला असता शुक्र वारी (दि. २३) पहाटेच्या सुमारास बिबट्याची मादी अडकली़ ही घटना सकाळी लक्षात आली.
येवला वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान
ढाकरे, राजापूरचे वनपाल ए.पी. काळे, विंचूरचे वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक दिलीप अहिरे, विजय लोंढे, भय्या शेख, रामचंद्र गंडे, दत्तू आहेर, काशीनाथ माळी, पिंटू नेहरे आदिंचे पथक तातडीने ढेपले यांच्या शेतात पोहोचले व बिबट्याला ताब्यात घेतले.
निफाड तालुक्यात बिबट्यांचे प्रमाण वाढत चालले असले तरी येवला वनविभाग या बिबट्यांना पकडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. या तालुक्यात येवला वनविभागाने एका वर्षात जवळजवळ १६ बिबटे जेरबंद केले आहेत. (वार्ताहर)