लोकमत न्यूज नेटवर्कनिफाड : तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक, सोनेवाडी खुर्द व परिसरातील गावांना शुक्र वारी मुसळधार पावसाने झोडपल्याने शेतामध्ये पाण्याचे तळे साचले होते. पाण्याचे प्रचंड लोंढे आचोळा नाल्यात शिरून पूरसदृश पाणी निफाडजवळील नाशिक-औरंगाबाद रोडवरून आचोळा नाला , शिवरे फाटा येथील सानप वस्तीसमोर मोठ्या स्वरूपात साचल्याने नाशिक- औरंगाबाद रोडवरील वाहतूक रात्री ७ वाजेदरम्यान ठप्प झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून निफाड तालुक्यात ढगाळ वातावरण व प्रचंड उष्मा असला तरी म्हणावा तसा पाऊस झाला नाही. मात्र शुक्रवारी सकाळपासूनच वातावरणात प्रचंड उकाडा त्यात ढगाळ वातावरण होते. दुपारी साडेतीन वाजेदरम्यान सोनेवाडी बुद्रुक, सोनेवाडी खुर्द, श्रीरामनगर, उगाव, शिवडी या गावांना मुसळधार पावसाने झोडपले. जवळजवळ दोन तास पाऊस सुरू होता. पावसाने प्रचंड वेगाने मारा करीत या गावांना झोडपून काढले. अनेक ठिकाणी शेतामधून पाण्याचे लोंढे वाहत होते. द्राक्ष बागांमध्ये प्रचंड पाणी साठले होते .सोनेवाडी खुर्द व इतर गावात शेतातील साठलेले पाणी काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. सोनेवाडी बुद्रुक ते थेटाळे या रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहत होते. पाऊस थांबल्यानंतर रस्त्यावरून वाहनधारकांना वाहने चालवणे अवघड होऊन बसले. शिवडी ते माळवाडी या दरम्यानच्या आचोळा नाल्यात प्रचंड पाणी साठले. शिवडी येथे शेतातील घराबाहेर गुडघाभर पाणी साठले होते. तालुक्यातील इतर गावात दिवसभर ढगाळ वातावरण होते.
निफाड तालुक्याला पावसाने झोडपले
By admin | Updated: June 10, 2017 00:54 IST