निफाडला बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार

By Admin | Updated: April 4, 2017 02:34 IST2017-04-04T02:34:19+5:302017-04-04T02:34:34+5:30

निफाड : येथील निफाड तालुक्यातील तारुखेडले शिवारात बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.३) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.

Niphad is killed in a leopard attack | निफाडला बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार

निफाडला बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार

 निफाड : येथील निफाड तालुक्यातील तारुखेडले शिवारात उसाच्या शेतालगत असलेल्या घराबाहेर खेळणाऱ्या बालिकेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि.३) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात बालिकेचा जागीच मृत्यू झाला.
तारुखेडले शिवारात शरद जगताप यांच्या मळ्यावर राखणदार म्हणून असलेले अशोक किसन हांडगे यांची पाच वर्षांची मुलगी घराजवळ खेळत होती. यावेळी अचानकपणे उसाच्या शेतामधून
बिबट्याने येऊन बालिकेला धरून फरफटत शेतात नेले. सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर तत्काळ तिच्या आई-वडिलांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या रहिवाशांना सावध केले. त्यानंतर गावकरी हातात लाठ्या-काठ्या, बॅटरी, टेंभे घेऊन शेताच्या दिशेने गेले. सुमारे तासभर शेत पिंजून काढल्यानंतर मयत अवस्थेत गुड्डी हांडगे या पाच वर्षीय बालिकेचा
मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला. गावकऱ्यांनी जखमी अवस्थेत गुड्डीला शेताबाहेर काढले; मात्र तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. गावाच्या सरपंचाकडून निफाड वन विभागाच्या कार्यालयाला घटनेची माहिती कळवूनदेखील रात्री साडेनऊ वाजेपर्यंत वनअधिकारी किंवा परिसरातील गस्त पथक घटनास्थळी पोहचले नव्हते. यामुळे तारुखेडले गावातील नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला असून, ऊ सशेतीत बिबट्यांच्या वाढत्या वास्तव्यामुळे बिबट्याचे हल्ले वाढत आहेत. दिवसेंदिवस निफाड तालुक्यातील गोदाकाठ पंचक्रोशीमध्ये मानव-बिबट्याचा संघर्ष वाढीस लागत असून, वन विभागाकडून सातत्याने प्रयत्न करूनदेखील बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. नागरिकांनी याबाबत सायंकाळनंतर अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे वनअधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मयत गुड्डीच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.
तारुखेडले गावात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून हांडगे कुटुंबीयांचे दु:ख समजू शकतो; मात्र वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने रहिवाशांनी सतर्कता बाळगावी तसेच वन विभागाच्या सावधानतेच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन नाशिक पूर्व वन विभागाचे उपवनसंरक्षक एन. रामानुजम यांनी केले आहे. वन विभागाच्या नियमानुसार मयत बालिकेच्या कुटुंबाला अर्थसहाय्य केले जाईल, असेही रामानुजम म्हणाले.

Web Title: Niphad is killed in a leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.