निफाडला एटीएममधून सुमारे १८ लाखांची चोरी
By Admin | Updated: August 29, 2015 00:01 IST2015-08-29T00:00:17+5:302015-08-29T00:01:19+5:30
अॅक्सिस बँक : मशीनचा आतील दरवाजा उघडला

निफाडला एटीएममधून सुमारे १८ लाखांची चोरी
निफाड : बँकांचे एटीएम मशीन फोडून त्यातील लाखो रुपयांची रक्कम चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना निफाडमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून अॅक्सीस बँकेच्या एटीएममधून १७ लाख ९६ हजार रुपये अज्ञात संशयितांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
या चोरीप्रकरणी अॅक्सिस बँकेच्या लाखलगाव शाखेचे असिस्टंट मॅनेजर सागर आडावदकर यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. अॅक्सिस बँकेचे निफाड शहरात शनि चौकात कर्डिले बिल्डिंगमध्ये एटीएम आहे. या एटीएमसमोर नाशिक मर्चंट बँकेची शाखा, तर याच बिल्डिंगमध्ये दुसऱ्या बाजूने स्टेट बँकेचे एटीएम आहे.
शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात संशयितांनी अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये ठेवलेले १७ लाख ९६ हजार ६०० रुपये काढून नेल्याचे सकाळी नागरिकांच्या लक्षात आले. शुक्रवारच्या चोरीत एटीएमचे सर्वात वरचे कव्हर काढून बाजूला ठेवून एटीएम मशीनचा आतील दरवाजा उघडून १७ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम काढून पुन्हा दरवाजा बंद केलेला होता. विशिष्ट कोड नंबर दाबल्याशिवाय हा दरवाजा उघडू शकत नाही, त्यामुळे मास्टरमाइंड संशयिताने ही चोरी केली असावी. असा संशय आहे. विशेष म्हणजे या एटीएमवर कुठेही ओरखडा नाही, की तोडफोडही केलेली नाही. त्यामुळे कोड नंबरचा वापर करूनच ही चोरी केली असल्याचा संशय आहे.निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट, पोलीस उपनिरीक्षक एस. उंबरकर यांनी या चोरीप्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. (वार्ताहर)