लोहोणेर : देवळा तालुक्यातील झिरेपिंपळ येथे रात्रीच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात नऊ मेंढया, दोन शेळ्या व बोकड ठार झाल्याने पशुपालकांमध्ये या बिबट्याच्या दहशतीने भीतीचे वातावरण पसरले असून, या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. शुक्रवारी( दि १२ ) रोजी देवळा तालुक्यातील झिरेपिंपळ शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने अशोक आहेर यांच्या ९ मेंढ्या व दीपक शेळके यांची १ शेळी तसेच आशाबाई आहेर यांची एक शेळी व एक बोकड अशा एकूण १२ जनावरांवर हल्ला चढवला. यात ती जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. या घटनेने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, घटनास्थळी वनपाल शांताराम आहेर व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णू झाम्बरे यांनी भेट देऊन पंचनामा केला. यात पशुपालकांचे जवळपास साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या जनावरांची भरपाई मिळावी, अशी मागणी या पशुपालकांनी केली आहे . याठिकाणी मोठ्या प्रमाणावर डाळिंबाच्या बागा आहे. वनविभागाने याची तात्काळ दखल घेऊन या परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा बसविण्यात यावा, अशी मागणी शेतकरी अतुल आहेर यांनी केली आहे. मध्यंतरी याठिकाणी बिबट्याने जनावरे फस्त केली आहेत. सध्या थंडीचे दिवस असल्याने शेतात वास्तव्यास असलेले नागरिक घरात झोपत असल्याने बिबट्या अंधाराचा व कोणी नसल्याचा फायदा घेत घराबाहेर बांधलेल्या जनावरांवर हल्ला चढवत असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात नऊ मेंढ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 00:49 IST