खुनेंच्या गोलंदाजीपुढे निमसे क्लीन बोल्ड
By Admin | Updated: November 21, 2015 00:11 IST2015-11-21T00:10:58+5:302015-11-21T00:11:33+5:30
भूसंपादन प्रकरण : मोबदल्याबाबत आयुक्तांनी दिली ग्वाही

खुनेंच्या गोलंदाजीपुढे निमसे क्लीन बोल्ड
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नांदूरनाका परिसरात भूसंपादनाची प्रक्रिया न करताच रस्ते तयार करण्यात आल्याचा आरोप कॉँग्रेसचे नगरसेवक उद्धव निमसे यांनी महासभेत केला आणि प्रशासनाला त्याचा जाब विचारला. परंतु, शहर अभियंता सुनील खुने यांनी वस्तुस्थिती कथन करत केलेल्या गोलंदाजीपुढे उद्धव निमसे निष्प्रभ होत क्लीन बोल्ड झाले. खुने विरुद्ध निमसे या रंगलेल्या सामन्याने सभागृहाचे मनोरंजन झाले परंतु शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाला सोयीस्कररीत्या बगल दिली गेली. अखेर आयुक्तांनीच न्यायालयाच्या निकालपत्रांचा आधार घेऊन संबंधित शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देण्याची ग्वाही द्यावी लागली.
महासभेत उद्धव निमसे यांनी नांदूरनाका ते हॉटेल जत्रा तसेच मौजे नाशिक शिवारात भूसंपादनाची प्रक्रिया न राबविताच रस्ते केल्याचे आणि त्याचा मोबदला अद्याप मिळाला नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. महापालिकेने शेतकऱ्यांची संमती नसताना रस्ते तयार केले. सरकारी मोजणी करण्यात आली नाही. भूसंपादनाची प्रक्रिया कायदेशीर झालेली नाही. १२ वर्षांपूर्वीचाही मोबदला मिळालेला नाही. रस्ते झाल्यानंतर सरकारी मोजणीची प्रक्रिया पार पाडली जात असल्याचे सांगत निमसे यांनी महापालिकेच्या बांधकाम, नगररचना व मिळकत विभागाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. यावेळी मिळकत विभागाचे प्रमुख बी. यू. मोरे यांनी निवेदन करताना सांगितले, भूमिअभिलेख कार्यालयाकडून सरकारी मोजणी करण्यात आलेली आहे. भूसंपादनाचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे जुन्या कायद्यानुसार पाठविले होते. त्रुटी पूर्तताही करण्यात आली आहे. संयुक्त मोजणीचे नकाशे अद्याप प्राप्त झालेले नाहीत. येत्या सप्ताहात ते प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन मोरे यांनी दिले. परंतु मोरे यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने निमसे यांनी आयुक्तांना जाब विचारला. यावेळी आयुक्तांनी शहर अभियंता सुनील खुने यांना खुलासा करण्याचे आदेशित केले. सुनील खुने यांनी सुरुवात करतानाच स्थायी समितीचे माजी सभापती असा उल्लेख करत निमसे यांच्या सूचनेवरूनच सदर रस्त्यांची कामे केल्याचे निदर्शनास आणून दिले शिवाय रस्त्यांच्या कामांच्यावेळी निमसे स्वत: नारळ वाढविण्याच्या प्रसंगी उपस्थित होते. ज्या-ज्यावेळी शेतकऱ्यांनी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळी निमसे यांनी शेतकऱ्यांना शांत करत महापालिका प्रशासनाला सहकार्य केल्याचेही खुने यांनी सांगताच निमसे नि:शब्द झाले. खुने आणि निमसे यांच्या रंगलेल्या सामन्यात सभागृहाचे मात्र निखळ मनोरंजन झाले.