निलगिरी बाग दंगल; दहा जणांवर गुन्हा

By Admin | Updated: October 16, 2015 21:40 IST2015-10-16T21:39:54+5:302015-10-16T21:40:38+5:30

औरंगाबादरोडवरील घटना : दगडफेकीत दोन जण जखमी

Nilgiri Bagh riots; Crime against ten | निलगिरी बाग दंगल; दहा जणांवर गुन्हा

निलगिरी बाग दंगल; दहा जणांवर गुन्हा

पंचवटी : औरंगाबादरोडवरील निलगिरी बाग मरीमाता मंदिराजवळ सुरू असलेल्या दांडिया कार्यक्रमादरम्यान गाणे वाजविण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी व दगडफेक झाल्याची घटना गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमाराला घडली.
या घटनेत दोघेजण जखमी झाले असून दगडफेक करीत उभ्या वाहनांच्या तसेच घरांच्या काचा फोडल्या प्रकरणी एकूण १० संशयितांवर परस्परविरोधी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सर्व संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. दगडफेकीच्या घटनेमुळे निलगिरी बाग येथील घरकुल आवास इमारतीत रात्री उशिरा तणावाचे वातावरण पसरले असल्याने पोलीस बळ तैनात करण्यात आले होते. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निलगिरी बाग येथील मरीमाता मंदिराजवळ नवरात्रोत्सवानिमित्ताने दांडियाचे आयोजन केले असून गुरुवारी रात्री दांडिया कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा एक गाणे लावावे या कारणावरून दोन गटात वाद झाले. त्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते घरकुल योजनेच्या बिल्डिंग क्रमांक ५ व ६ येथे उभे असताना दगडफेक सुरू झाली. यात दोन्ही गटाच्या संशयितांनी परस्परांच्या घराच्या, वाहनांच्या काचा फोडल्या. या घटनेत भारत रघुनाथ वळवी, दीपक रघुनाथ वळवी असे दोघेजण जखमी झाले आहेत. या घटनेबाबत निलगिरी बाग येथे राहणाऱ्या दीपक वळवी व संजय सदावर्ते यांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केली असून दीपक वळवी, शैलेश झनकर, सुनील खरात, मच्छिंद्र पवार, जितू झनकर, देवा अहिरे, विकास लहाने,जीवन शिंदे, दलुचंद सोनवणे, संजय सदावर्ते अशा दहा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. मनपा प्रशासनाने बांधलेल्या या घरकुल आवास योजनेच्या इमारतीत निलगिरी बाग तसेच फुलेनगर झोपडपट्टीतील लाभार्थी राहत असल्याने व त्यातच एकमेकांवर वर्चस्व निर्माण करण्याच्या कारणावरूनच रात्री ही दंगल घडल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Nilgiri Bagh riots; Crime against ten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.