नाशकात पुन्हा 'नाईट कर्फ्यू' ; सामान्यांनाही लवकरात लवकर लस द्या : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 07:16 PM2021-02-21T19:16:18+5:302021-02-21T19:19:54+5:30

नाशिक शहरात गेल्या आठवडाभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज सरासरी दोनशे इतकी वाढली. कोरोनाचा फैलाव पुन्हा वेगाने होऊ लागल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

'Night curfew' again in Nashik; Vaccinate the common man as soon as possible: Chhagan Bhujbal | नाशकात पुन्हा 'नाईट कर्फ्यू' ; सामान्यांनाही लवकरात लवकर लस द्या : छगन भुजबळ

नाशकात पुन्हा 'नाईट कर्फ्यू' ; सामान्यांनाही लवकरात लवकर लस द्या : छगन भुजबळ

Next
ठळक मुद्देनाशकात रविवारी (दि.२१) ३५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.शहरात २५४ तर ग्रामिण भागात ७५ आणि मालेगावात १६ नवे कोरोनाबाधित एकुण ४०७ कोरोना चाचणी अहवाल प्रगतीपथावर गोरज मुहुर्तावर 'शुभमंगल' सोहळे टाळण्याचे आवाहन

नाशिक : शहर व परिसरात मागील काही दिवसांत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा नाशकात रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्याची घोषणा रविवारी (दि.२१) संध्याकाळी पत्रकार परिषदेत केली. तसेच शहरात मास्क न लावता वावरणाऱ्या बेफिकिर नागरिकांकडून मनपाच्या भरारी पथकांमार्फत १००० रुपयांचा दंड वसुल केला जाणार आहे. तसेच संबंधितांविरुध्द जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलिसांकडून केली जाणार असल्याचेही संकेत भुजबळ यांनी दिले आहे.

नाशिक शहरात गेल्या आठवडाभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज सरासरी दोनशे इतकी वाढली. कोरोनाचा फैलाव पुन्हा वेगाने होऊ लागल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोनाबाधितांचा आकडा मागील चार दिवसांत अचानकपणे वाढल्याने प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.

नाशिकमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून पोलीस प्रशासनाकडून रात्रीच्या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मास्क न लावता सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांना १ हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे कठोरपणे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. सध्या तरी शाळा, महाविद्यालये सुरुच राहणार असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे; मात्र कोरोनापासून बचावासाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोरोनाने डोके वर काढण्यास पुन्हा सुरुवात केल्याने शहरात निर्बंध कडक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गोरज मुहुर्तावर 'शुभमंगल' सोहळे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लग्नसोहळे, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना लोंंढे येणार नाही, याबाबत खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही लवकरात लवकर लसीकरण उपलब्ध करुन देण्याची मागणीही भुजबळ यांनी यावेळी केली आहे.
नाशकात रविवारी (दि.२१) ३५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये शहरात २५४ तर ग्रामिण भागात ७५ आणि मालेगावात १६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तसेच रविवारी दिवसभरात १३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तसेच तीन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. यामध्ये शहरात १ तर ग्रामीण भागातील २ रुग्णांचा समावेश आहे. एकुण ४०७ कोरोना चाचणी अहवाल प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात एकुण १लाख १९ हजार ९५८ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी १ लाख १५हजार ९२५ रुग्ण उपचारादरम्यान बरे झाले आहेत. तसेच १ हजार १७६ कोरोनाबाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत.

Web Title: 'Night curfew' again in Nashik; Vaccinate the common man as soon as possible: Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.