सोशल मीडियाद्वारे कॅन्सर, एड्सवरील औषधांच्या नावाखाली फसवणूक करणाºया नायजेरियनास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 22:08 IST2017-10-03T22:07:58+5:302017-10-03T22:08:04+5:30
तरुणीने सांगितलेल्या संकेतस्थळावरील क्रमांकाशी संपर्क साधून तक्रारदाराने एक किलो औषधांची आॅर्डर दिली तसेच मुंबईला जाऊन औषधे विकत घेतली़ मात्र औषधांच्या नावाखाली फक्त बिया दिल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले.

सोशल मीडियाद्वारे कॅन्सर, एड्सवरील औषधांच्या नावाखाली फसवणूक करणाºया नायजेरियनास अटक
नाशिक : सोशल मीडियाद्वारे चाळीस ते पन्नास वयोगटांतील व्यक्तीसोबत संपर्क साधून कॅन्सर व एड्सवरील औषध खरेदी करण्यास सांगून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणारा नायजेरियन संशयित निल्स हॅम्पे (३०, नवी मुंबई, मूळ राहणार नायझेरिया) यास सायबर पोलिसांनी मंगळवारी (दि़०३) मुंबईहून अटक केली़ हॅम्पे हा आपल्या टोळीतील तरुणींकडून नागरिकांना औषधे खरेदी करण्याची गळ घालीत असे़ याप्रकरणी २२ जुलै २०१७ रोजी तक्रार करण्यात आली होती़
संशयित हॅम्पेच्या टोळीतील तरुणी फेसबुकवरून ४० ते ५० वयोगटातील व्यक्तींसोबत मैत्री करीत़ यानंतर आपली नोकरी संकटात असल्याचा बहाणा करून मदत मागत असत़ शहरातील एका तक्रारदारास या तरुणींनी अशाचप्रकारे जाळ्यात सापडवले़ या तरुणींनी आमची कंपनी संकेतस्थळावरून पाच लाख पौंडाला औषधे खरेदी करते. ही औषधे केवळ ५० हजार ते १ लाख रुपयांत मिळतील. तसेच ही औषधे खरेदी करून आमच्या कंपनीस पुरवणार का? असे ही तरुणीने तक्रारदारास विचारले.
तरुणीने सांगितलेल्या संकेतस्थळावरील क्रमांकाशी संपर्क साधून तक्रारदाराने एक किलो औषधांची आॅर्डर दिली तसेच मुंबईला जाऊन औषधे विकत घेतली़ मात्र औषधांच्या नावाखाली फक्त बिया दिल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सायबर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली असता पोलिसांनी मुंबई येथे सापळा रचून त्यास अटक केली़ त्याच्याकडून अनेक फसवणुकीचे गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़