निफाड @ ६
By Admin | Updated: January 21, 2016 22:00 IST2016-01-21T21:59:59+5:302016-01-21T22:00:32+5:30
निफाड @ ६

निफाड @ ६
निफाड : तालुक्यात गुरुवारी सकाळी तपमानात थोडी वाढ झाल्याने कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्राच्या हवामान केंद्रात ६ अंशांची नोंद करण्यात आली आहे.
बुधवारी सकाळी ५.४ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तपमानाची नोंद झाल्याने अवघा निफाड तालुका थंडीने गारठून गेला होता. परंतु गुरुवारी तपमानात काहीशी वाढ होत ६ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. त्यामुळे थंडीचे प्रमाण भरपूर होते. तालुक्यात सकाळ सत्राच्या शाळांना येणारे विद्यार्थी काही प्रमाणात थंडीमुळे उशिरा आले. गुरुवारी सुद्धा सकाळच्यादरम्यान नागरिकांना शेकोट्यांचा आधार घ्यावा लागला. दिवसभरही तालुक्यात गारव्याचे मोठे प्रमाण होते. तपमानात घट होऊन थंडी काही प्रमाणात कमी झाल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता कमी झाली आहे. ही थंडी गहू, कांदा उत्पादकांसाठी फायदेशीर ठरत आहे.
कोनांबे: सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कोनांबे परिसरात गत चार दिवसांपासून ढगाळ वातावरणासह कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीचा वाढलेला जोर काही पिकांसाठी लाभदायक तर काहींना हानीकारक ठरत असल्यामुळे शेतकऱ्यांची ‘कही खुशी, कही गम’ अशी संमिश्र अवस्था झाली आहे.
कोनांबे परिसरात पावसाचे प्रमाण कमी असल्याने विहीरींनी तळ गाठलेला आहे. त्यामुळे लागवड केलेल्या पिकांना पाणी देणे जिकरीचे होत असतांनाच वाढलेल्या थंडीमुळे जमिनीतील आर्द्रतेतही वृध्दी झाली आहे. त्याचा कांदा, लसूण, गहू, हरभरा, ज्वारी या पिकांनाही लाभ होऊन ती जोरदार दिसू लागली आहे. कोनांबे परिसरात द्राक्ष बागांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर आहे. वाढत्या थंडीमुळे द्राक्ष बागायतदारांची तारांबळ उडाली आहे. बदलत्या हवामानामुळे उशिरा छाटणी झालेल्या द्राक्ष बागांवर भुरी, डाऊनी या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. याशिवाय पक्व होत असलेल्या बागांचे मनी तडकण्याचेही प्रमाण वाढण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या बदलत्या हवामानाचा फटका द्राक्ष बागांना बसू नये यासाठी उपाययोजना करताना द्राक्ष बागायतदारांचा आर्थिक खर्च वाढत आहे. गेल्या काही दिवसांत थंडीचा जोर कायम राहिल्याने काही पिकांना फायदा होत असल्याचा आनंद तर काही पिकांचे होत असलेल्या नुकसानीचे दु:ख अशी संमिश्र भावना शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. (वार्ताहर)