दुसऱ्या दिवशी दीडशे अर्ज विक्री
By Admin | Updated: February 3, 2016 23:00 IST2016-02-03T22:56:12+5:302016-02-03T23:00:28+5:30
जिल्हा मजूर संघ निवडणूक : पाच अर्ज दाखल

दुसऱ्या दिवशी दीडशे अर्ज विक्री
नाशिक : नाशिक जिल्हा सहकारी मजूर संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.३) उमेदवारी नामनिर्देशन अर्ज विक्रीच्या दुसऱ्या दिवशी १४५७ अर्जांची विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच तीन उमेदवारांनी पाच अर्ज दाखल केले आहेत. दोन दिवसांत एकूण २०१ अर्जांची विक्री झाली आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये निफाड तालुक्यातून संचालक पदासाठी योगेश गोलाईत यांनी दोन अर्ज, तर अशोक नागरे यांनी निफाड तालुका, तसेच भटक्या विमुक्त जमाती गटातून प्रत्येकी एक अर्ज दाखल केला. तसेच शिवाजी कासव यांनी चांदवड तालुका संचालक पदासाठी अर्ज दाखल केला असून, कालपर्यंत एकूण पाच अर्ज दाखल झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विद्यमान संचालकांच्या एका गटाने प्रयत्न सुरू केले असून, त्यानुसार बैठकाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सोमवारी (१) विभागीय सहनिबंधक कार्यालयाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. विभागीय उपनिबंधक सतीश खरे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहात आहेत.
जिल्हा मजूर संघाच्या सभासद मतदारांची संख्या ११८९ असून, त्यापैकी ११३६ सभासदांचे ठराव करण्यात आल्याने हे ११३६ सभासद मतदानासाठी पात्र ठरले आहेत. (प्रतिनिधी)