मिळकत सोडण्यास ते तयार नसल्याचे वृत्त
By Admin | Updated: July 18, 2014 01:35 IST2014-07-18T01:26:51+5:302014-07-18T01:35:21+5:30
मिळकत सोडण्यास ते तयार नसल्याचे वृत्त

मिळकत सोडण्यास ते तयार नसल्याचे वृत्त
नाशिक : पालिकेच्या मिळकती नाममात्र दराने राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींशी संबंधित संस्थांना देण्यामुळे उच्च न्यायालयाने पालिकेचे कान उपटले असताना, कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या शिक्षण संस्थेला देण्यात आलेली मिळकत सोडण्यास ते तयार नसल्याचे वृत्त आहे. गेल्या कुंभमेळ्याच्या वेळी पालिकेचे नियंत्रण कक्ष असलेल्या या इमारतीचा तात्पुरता ताबा सोडण्यावरूनही पानगव्हाणे यांनी जिल्हा न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील सुनावणी १९ जुलैस होणार आहे.
पंचवटीत तपोवन येथे जनार्दनस्वामी आश्रमाजवळ ही इमारत आहे. गेल्या कुंभमेळ्याच्या वेळी या इमारतीत नियंत्रण कक्ष आणि पालिकेचा दवाखाना होता. कुंभमेळ्यानंतर ही जागा पानगव्हाणे यांनी घेतली असली, तरी ती कुंभमेळ्यात पालिकेला तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा ताब्यात देण्याची अट त्यांनी मान्य केली होती. त्यानुसार महापालिकेने मे महिन्यात त्यांच्या संस्थेस पत्र दिले असून, जानेवारी २०१५ मध्ये ही इमारत रिकामी करून देण्याची विनंती केली. परंतु जानेवारीत नव्हे तर त्यानंतर ती इमारत देऊ, पुन्हा या इमारतीचा ताबा मिळाला पाहिजे, असे संस्थाचालकांचे म्हणणे असून, त्यासंदर्भात जिल्हा न्यायालयात त्यांनी दावा दाखल केला आहे. न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिल्याने पालिका अडचणीत आली आहे. यासंदर्भात बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर १९ जुलै ही पुढील तारीख देण्यात आल्याचे मिळकत व्यवस्थापक तथा विधी अधिकारी बी. यू. मोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)