नववर्षाचे स्वागत
By Admin | Updated: April 8, 2016 23:30 IST2016-04-08T22:13:06+5:302016-04-08T23:30:25+5:30
जल्लोष : जिल्ह्यात शोभात्रांसह मिरवणुका

नववर्षाचे स्वागत
सिन्नर : सनईचे मंगलमय सूर, त्याला मिळालेली टाळ-मृदंगाच्या गजराची साथ, संबळ-पिपाणीचा ठेक्यावर परंपरिक वेशभूषा केलेल्या नागरिकांची थिरकणारी पावले आणि त्यांच्यावर घराघरांतून होणारी पुष्पवृष्टी अशी मराठमोळी संस्कृती व परंपरेचा ठेवा जपाणारी शोभायात्रा येथे उत्साहात पार पडली.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने मराठी बाणा व संस्कृती टिकविण्यासाठी येथील सिन्नर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित शोभायात्रा कार्यक्रमास सिन्नरकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. सकाळी शिवाजी चौकात वंदे मातरम् संघटनेची २१ फूट उंच गुढी उभारून पारंपरिक पद्धतीने पाडव्याचा सण व मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
घोटी : येथे गुढीपाढव्याच्या निमित्त मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी कृष्णकुंज मित्रपरिवार व संताजी मित्रमंडळाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रा जनता विद्यालय ते जैन मंदिरमार्गे तेली गल्ली परिसरातून ढोल-ताशाच्या गजरात भगवान श्रीराम की जय घोषणांनी घोटी शहर दुमदुमले तसेच भगवेमय झाले होते. शोभायात्रेत भारतमाता देखाव्यासह परिसरात भीषण दुष्काळाचे सावट असल्याने ‘पाण्याचे महत्त्व’ देखाव्या भवती मांडण्यात आले होते. घोटी शहरात संताजी युवक मित्रमंडळाच्या वतीने श्रीकांत काळे यांनी १०१ गुढी विविध क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांना भेट स्वरूपात दिल्या. तेली गल्ली येथे संघपती नंदकुमार शिंगवी यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. याप्रसंगी ग्रामपालिका सफाई कामगारांना कपडे वाटप करण्यात आले. यामध्ये माजी आमदार शिवराम झोले, गणपतदादा कडू, बाबुलाल भोर, निवृत्ती पा. जाधव, उदय जाधव, कुलदीप चौधरी, रमेश काळे, विठ्ठल वालतुले, मोहन भगत, रामदास शेलार, समाधान जाधव, शरद हांडे, संदीप जाधव, हरिष चव्हाण, कैलास कस्तुरे, जगन भगत, बाळासाहेब भगत, अरुण सोनार, गणेश काळे, विठ्ठल काळे, जि. प. सदस्य अलका जाधव, तसेच संताजी युवक मित्रमंडळ व कृष्णकुंज मित्र परिवाराचे पदाधिकारी उपस्थित होते. (लोकमत ब्युरो)
शोभायात्रेत सहभागी झालेल्या पाहुण्यांचा सन्मान मंडळाच्या वतीने श्रीकांत काळे यांनी केले.