समित्यांसाठी नवी वाहने
By Admin | Updated: April 28, 2017 02:24 IST2017-04-28T02:23:57+5:302017-04-28T02:24:08+5:30
नाशिक : महापालिकेत तीन अतिरिक्त समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याने समित्यांच्या सभापतींसाठी नव्याने वाहने खरेदी करावी लागणार आहेत

समित्यांसाठी नवी वाहने
नाशिक : महापालिकेत सत्तारूढ झालेल्या भाजपाने नव्याने विधी, आरोग्य आणि शहर सुधारणा या तीन अतिरिक्त समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याने या समित्यांसाठी प्रशासनाला लाखो रुपये खर्चाचीही तरतूद करावी लागणार आहे. प्रामुख्याने, समित्यांच्या सभापतींसाठी नव्याने वाहने खरेदी करावी लागणार आहेत.
महापालिकेत बहुमताने सत्ता संपादन करणाऱ्या भाजपाने पक्षाच्या अधिकाधिक सदस्यांना सत्तापदांचा लाभ मिळावा यासाठी यापूर्वी अस्तित्वात असलेल्या व प्रभाग समित्यांची रचना झाल्यानंतर बरखास्त झालेल्या विधी, आरोग्य आणि शहर सुधारणा समित्या पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मे महिन्यात सदर समित्या गठित होण्याची शक्यता आहे. प्रत्येक समितीवर सभापती व उपसभापतीची निवड केली जाणार असून, समितीसाठी स्वतंत्र दालनाचीही व्यवस्था करावी लागणार आहे. तसेच दालनासाठी दूरध्वनी सेवेसह एक लिपिक, एक शिपाई, असा कर्मचारीवर्गही उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. प्रामुख्याने या सभापतींसाठी नव्याने वाहन उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. सध्या महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व विरोधी पक्षनेता यांना वाहन व चालक उपलब्ध करून देण्यात आला आहे, तर सभागृहनेता, महिला व बालकल्याण समिती सभापती आणि शिक्षण समिती सभापती यांच्यासाठी तीन वाहने तैनात ठेवण्यात आली आहेत. याशिवाय, सहा प्रभाग समित्यांच्या सभापतींनाही वाहने उपलब्ध करून द्यावी लागतात. त्यांच्यासाठीही तीन वाहनांची उपलब्धता आहे. मात्र, नव्याने गठित होणाऱ्या विधी, आरोग्य व शहर सुधार समिती सभापतींसाठी आणि प्रभाग समित्यांच्या उर्वरित तीन सभापतींनी मागणी केल्यास त्यांनाही वाहन उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. त्यामुळे तब्बल सहा नवीन वाहने खरेदी करणे अनिवार्य होणार आहे. महापालिकेची एकूणच आर्थिक स्थिती पाहता त्यात या नव्या समित्यांच्या व्यवस्थापनाचा खर्च माथी पडणार आहे. (प्रतिनिधी)