शिक्षण खात्याचे दरवर्षी नवीन सॉफ्टवेअर
By Admin | Updated: September 21, 2015 23:25 IST2015-09-21T23:23:52+5:302015-09-21T23:25:38+5:30
होऊ द्या खर्च : वेतनेतर अनुदान देण्यास टाळाटाळ

शिक्षण खात्याचे दरवर्षी नवीन सॉफ्टवेअर
नाशिक : शिक्षण खात्याचे सर्व बजेट शिक्षकांच्या वेतनावर खर्च होत असल्याचे ठिकठिकाणी सांगणाऱ्या शिक्षण मंत्र्यांनी दरवर्षी नवीन नियमांमुळे अगोदरचे सॉफ्टवेअर बदलून नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी खर्च सुरू केला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी शिक्षक सूचीसाठी एक सॉफ्टवेअर तयार केले जात असताना पुढील वर्षीसाठी आणखी एक नवे सॉफ्टवेअर तयार केले जात असून, त्यामुळे मोठा भुर्दंड सोसावा लागणार आहे. विशेष म्हणजे संस्थाचालक आणि शाळांना त्यानुरूप माहिती संकलनासाठी पुन्हा पुन्हा वेळ खर्च करावा लागत आहे.
राज्य शासनाने सर्वच कारभार आॅनलाइन करण्यास कोणाचे दुमत नाही. मात्र शिक्षण खात्यात दरवर्षी नवीन सॉफ्टवेअरचा प्रयोग आणि तत्काळ माहिती भरून घेण्याच्या नावाखाली गोंधळ सुरू असून, त्यात अकारण शाळा कर्मचारी भरडले जात आहेत. दरवर्षी नवीन सचिव आणि त्यांनी नवीन कल्पना, राज्य शासनाचे नवीन नियम यामुळे सॉफ्टवेअरमध्ये दरवर्षीच बदल करावा लागत आहे. २०१३-१४ या वर्षासाठी एका कंपनीकडून सॉफ्टवेअर तयार करण्यात आले होते. शासनाच्या नियमात बदल करण्यात आल्याने २०१४-१५ या वर्षासाठी नवीन सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे. त्यातच शासनाने आणखी काही नियम बदलल्याने २०१५-१६ या वर्षासाठी आणखी नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नवनाथ औताडे यांनी त्यास दुजोरा दिला आहे. मुळातच सध्याचे शैक्षणिक वर्ष संपण्यास आले आहे. त्यात गेल्यावर्षीच्या सूचीनुसार अद्याप शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली नाही आणि आता त्यात आणखी बदललेल्या नियमांची भर पडल्याने शासनाचा हा घोळ कधी मिटणार असा प्रश्न निर्माण झाल्याची संस्थाचालकांची तक्रार आहे. दरवेळी बदललेल्या सॉफ्टवेअरनुसार नवीन माहिती भरून द्यावी लागत असल्याने शाळाही त्रस्त झाल्या आहेत. (प्रतिनिधी)