नवीन कल्पना, संशोधनाला चालना मिळणे आवश्यक
By Admin | Updated: August 13, 2016 00:02 IST2016-08-12T23:59:40+5:302016-08-13T00:02:09+5:30
वासुदेव गाडे : विद्यापीठाच्या डिझाइन इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन

नवीन कल्पना, संशोधनाला चालना मिळणे आवश्यक
नाशिक : विद्यापीठातील संशोधनाचा थेट समाजाला फायदा व्हावा, यासाठी विद्यार्थ्यांच्या कल्पकता व नावीन्यपूर्ण संशोधनाला चालना मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या अशा कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच विविध कारणांनी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगार आणि औद्योगिकदृष्ट्या स्वयंनिर्भर करण्याच्या उद्देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नाशिक येथे डिझाइन इनोव्हेशन सेंटर उभारण्यात येत असल्याचे प्रतिपादन कुलगुरू वासुदेव गाडे यांनी के ले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कॉलेज आॅफ आर्किटेक्चर सेंटर फॉर डिझाइन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशकात डिझाइन इनोव्हेशन सेंटर उभारण्यात आले असून कुलगुरू वासुदेव गाडे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १२) या सेंटरचे उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर विद्यापीठ व महाविद्यालय विकास संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड, संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, डॉ. सुनील ढिकले, प्राचार्य प्राजक्ता बस्ते, समन्वयक सुवर्णा पाटील, दिलीप पाटील, नाना दळवी, नाना महाले, शिरीष कोतवाल, मुरलीधर पाटील आदि उपस्थित होते. कुलगुरू म्हणाले, विद्यापीठाकडून उपकेंद्रासाठी प्राथमिक टप्प्यात दीड कोटींचे अर्थसाहाय्य मिळणार असून विद्यापीठामार्फत पर्यावरण व जल व्यवस्थापन, पीकवाढीच्या आधुनिक पद्धती, संगणकीय डिझाइन, इलेक्ट्रॉनिक सेन्सर, औषधनिर्मिती या विषयात डिझाइन इनोव्हेशन सेंटरमार्फत प्रमाणपत्र अभ्यासक्र म सुरू केले जाणार आहेत. त्याचे स्वरूप आंतर विद्याशाखीय आहे. त्यामुळे विविध कारणांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडणाऱ्या ड्रॉप आउट विद्यार्थ्यांना तांत्रिक व रोजगाराभिमुख शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या सेंटरची मदत होणार असून विद्यार्थ्यांनी शहरासह ग्रामीण, आदिवासी भागातील नागरिकांना दैनंदिन वापरात उपयोगी पडतील अशा स्वरूपाची उपकरणांची रचना व निर्मिती करावी, असे आवाहन त्यांनी के ले. प्रास्ताविक उपकेंद्राच्या समन्वयक सुवर्णा पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)