नव्या भावगीतांचे बरसणार सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2016 23:07 IST2016-03-27T22:52:11+5:302016-03-27T23:07:18+5:30
नव्या भावगीतांचे बरसणार सूर

नव्या भावगीतांचे बरसणार सूर
नाशिक : ज्येष्ठ गायक व संगीतकार सुरेंद्र व राजेंद्र बुरसे यांनी बसवलेला संपूर्ण नव्या भावगीतांचा ‘सूर बरसे’ हा कार्यक्रम येत्या शुक्रवारी (दि. १ एप्रिल) महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित करण्यात आला असून, यानिमित्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, योगेश्वर अभ्यंकर यांसारख्या सिद्धहस्त कवींच्या पण आजवर संगीतबद्ध न झालेल्या रचना ऐकण्याची संधी मिळणार आहे.
पारंपरिक भावगीतांऐवजी उपरोल्लेखित दिग्गज कवींसह नाशिकमधील कवी पंढरीनाथ सोनवणे, कवयित्री साधना शुक्ल-राव, सोलापूर येथील मुबारक शेख, पुणे येथील अशोक बुरसे यांच्या अर्थपूर्ण कविता निवडून त्यांना सुरेंद्र बुरसे यांनी संगीतबद्ध केले आहे. अशा संपूर्ण नव्या भावगीतांच्या या कार्यक्रमाचा प्रारंभ नाशकातून होत आहे. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमात मकरंद हिंगणे, राजेंद्र बुरसे, गौरव बुरसे, स्नेहल बुरसे, अनुराधा पाठक, प्राची चाफेकर, अपर्णा पठाडे गायन करणार आहेत. संहिता व निवेदन श्रीधर पाठक यांचे असून, प्रमोद जांभेकर, दीपक उपाध्ये, साई-पीयूष, सौरभ बुरसे हे संगीतसाथ करणार आहेत, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, कार्यवाह सुनील ढगे, राजेंद्र जाधव, सुनील परमार उपस्थित होते.