समाजकार्यासाठी नवी पिढी दिलासादायक
By Admin | Updated: October 11, 2015 00:12 IST2015-10-11T00:11:50+5:302015-10-11T00:12:07+5:30
विनायकदादा पाटील : ज्ञानेश्वर काकड यांना आर. आर. पाटील पुरस्कार प्रदान

समाजकार्यासाठी नवी पिढी दिलासादायक
नाशिक : राजकारणाचा सत्तेशी संबंध नसतो. ज्याचे समाज ऐकतो, तोच खरा नेता असतो. महाराष्ट्राचे पुढे कसे होईल, याची चिंता करीत असताना, समाजकार्यात येणारी ज्ञानेश्वर काकड यांच्यासारखी नवी पिढी दिलासादायक आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांनी काढले.
मखमलाबाद येथील सार्वजनिक वाचनालय व ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित स्व. आर. आर. (आबा) पाटील उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार मखमलाबाद येथील ज्ञानेश्वर काकड यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पाटील बोलत होते. स्व. मधुकर फडोळ यांच्या स्मरणार्थ सदर पुरस्कार सुरू करण्यात आला असून, त्याचे यंदाचे पहिलेच वर्ष आहे. दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पत्नी तथा आमदार सुमन पाटील, मुलगी स्मिता, पुतणी प्रियंका यांच्यासह आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, नगरसेवक सिंधू खोडे, दामोदर मानकर, छबू नागरे, राजाभाऊ मोगल, अंबादास दिघे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पाटील म्हणाले, महाराष्ट्र घडविणाऱ्यांची यादी आबांच्या नावाशिवाय इतिहास पूर्ण करू शकणार नाही. समाजात सगळेच काही वाईट नसते. चांगल्या-वाईटाचे प्रमाण कौरव-पांडवांच्या काळापासून चांगले कमी व वाईट अधिक असेच राहिले आहे. पारड्यात जेव्हा चांगुलपणाचे तुळशीपत्र पडते, तेव्हा ते जड होते. माणुसकीमुळेच समाजातील बऱ्या-वाईटात समतोल राहतो. अशी माणुसकी जपणारी नवी पिढी तयार होत असून, या पिढीने राजकारणात येण्याची गरज आहे.
स्मिता यांनी आपल्या भाषणात समाजाच्या प्रश्नांची नाळ ओळखणारे कार्यकर्ते तयार होण्याची गरज असल्याचे सांगतानाच आबांच्या आठवणींना उजाळा दिला. राजकीय वारसा, आर्थिक पाठबळ नसूनही उपमुख्यमंत्रिपदापर्यंत झेप घेतली. त्यांच्या घडण्यामागे आईचा मोठा वाटा होता. ते असताना आम्ही कधी घराबाहेर पडलो नाही. आबांच्या अचानक जाण्याच्या दु:खातून सावरणे कठीण होते, दोन महिन्यांतच पोटनिवडणूक होती; पण आबांचा विचार जिवंत राहावा, यासाठी आईने आमदारकीची निवडणूक लढवली व जिंकली. आपल्यात आज विठ्ठल नसला, तरी रुक्मिणीने समाजकार्याची जबाबदारी स्वीकारली असून, आम्ही सारे चांगले काम करू. राज्यात सध्या बिकट परिस्थिती आहे. एकेकाळी आबांनी डान्सबारवर बंदी आणली असताना, आज मात्र अवैध धंद्यांचा सुकाळ आहे. ९ ते १२ वर्षांची मुले मटका खेळताना आपण स्वत: पकडून दिली आहेत. व्यसन कोणतेही असो, ते चांगले नसतेच, असे सांगत त्यांनी मुलींना राजकारणात सक्रिय होण्याचे आवाहन केले.
प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. संयोजक संजय फडोळ यांनी प्रास्ताविक करीत पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. रामचंद्र काकड व अॅड. पंडित पिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. नारायण काकड यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. (प्रतिनिधी)