नाशिक : राज्य शासनाने नुकत्याच लागू केलेल्या सर्वसमावेशक एकात्मिक बांधकाम नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली बांधकाम क्षेत्रास चालना मिळणार आहे. या नियमावलीमुळे सामान्य नागरिकांना लाभ होणार असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.
राज्य शासनाने संपूर्ण राज्यातील शहरांसाठी तयार केलेल्या एकात्मिक बांधकाम नियंत्रण नियमावलीसंदर्भात बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या संस्थेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचा मंगळवारी (दि.१२) समारोप करण्यात आला. त्यावेळी गमे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, नगररचना विभागाचे माजी सहसंचालक प्रकाश भुक्ते, नाशिकच्या सहसंचालक प्रतिभा भदाणे, क्रेडाई राष्ट्रीयचे सल्लागार जितूभाई ठक्कर, राष्ट्रीय कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर, संस्थेचे राज्य सचिव सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नव्या नियमावलीत सामान्य नागरिक हा केंद्रबिंदू असल्याचे सांगून क्रेडाईच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले.
गेल्या काही वर्षांतील बांधकाम व्यवसायातील मंदी, अनैसर्गिकरीत्या वाढलेले जमिनीचे भाव व कोविड यामुळे अडचणीत सापडलेल्या स्थितीत महाराष्ट्र शासनाच्या निर्णयांनी संजीवनी मिळाली आहे, असे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. तर अनंत राजेगावकर यांनी नियमावलीमुळे समतोल विकास होणार असून महाराष्ट्रातील नगररचना विभागाचे कार्य हे सकारात्मक आहे, असे सांगितले.
जितूभाई ठक्कर यांनी बांधकाम व्यावसायिक व वास्तुविशारद यांचे काम हे सृजनशील निर्मितीचे असून या नियमावलीमुळे त्यांचा महत्त्वाचा वेळ परवानग्या मिळवण्यात जाणार नाही, असे सांगितले. रवी महाजन यांनी या नियमावलीच्या मंजुरीमुळे अनेक त्रुटी दूर झाल्या असून यामुळे परवडणाऱ्या घरांची संख्या वाढून घरांच्या किमती कमी होण्यास मदत होणार आहे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्किटेकट अर्चना पेखळे व योगेश महाजन यांनी केले, तर आभार सचिव गौरव ठक्कर यांनी मानले. कार्यक्रमासाठी माजी संचालक कमलाकर आकोडे, राजन कोप, सहसंचालक सुलेखा वैजापूरकर, विजय गोस्वामी, जितेंद्र भोपळे आदी मान्यवर उपस्थित होते.
छायाचित्र आर फोटेावर १२ क्रेडाई नावाने