नेपाळी साधूंना मिळेना जागा
By Admin | Updated: August 2, 2015 23:26 IST2015-08-02T23:23:45+5:302015-08-02T23:26:38+5:30
वणवण सुरू : भूकंपामुळे झाला उशीर; तीनशे साधू येणार

नेपाळी साधूंना मिळेना जागा
नाशिक : गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे कुंभमेळ्याला उशिरा दाखल झालेल्या नेपाळी साधूंना जागा मिळू शकलेली नाही. कुंभमेळ्यासाठी नेपाळमधून तीनशे साधू येणार असून, त्यांच्यासाठी साधुग्राममध्ये जागा मिळवण्याची धडपड सुरू आहे.
एप्रिल महिन्यात नेपाळमध्ये महाभयानक भूकंप झाल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले. ते अद्याप सुरळीत होऊ शकलेले नाही. भूकंपामुळे नेपाळमधील साधू-संत नाशिकला साधुग्राममध्ये जागा आरक्षित करण्यासाठी येऊ शकले नव्हते. त्यामुळे आता त्यांच्या जागेचा पेच निर्माण झाला आहे. नेपाळमधील मुक्तिधाम यात्री सेवा संस्थानाचे प्रबंधक माधवाचार्य हे आज नाशिकमध्ये दाखल झाले. नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूपासून सुमारे अडीचशे किलोमीटरवर धवलागिरी भाग आहे. या भागातील मेगदी जिल्ह्यातील पोखरेबगर गावात हे संस्थान वसले आहे. संस्थानचे एकूण आठ आश्रम होते. भारतातून नेपाळमध्ये देवदर्शनासाठी जाणाऱ्या साधू-संतांच्या भोजन-निवासाची व्यवस्था या आश्रमांत केली जात होती; मात्र भूकंपात यांपैकी सात आश्रम उद्ध्वस्त झाले असून, नव्याने बांधलेली एका आश्रमाची इमारतच उरली आहे. फलाहारी बाबा हे या आश्रमाचे प्रमुख आहेत. त्यांच्यासह नेपाळमधील सुमारे तीनशे साधू-महंत कुंभमेळ्यासाठी नाशिकला येणार आहेत. त्यांच्या जागेची व्यवस्था कशी करावी, असा पेच माधवाचार्य यांच्यासमोर आहे. नेपाळमधून बस, रेल्वेने प्रवास करीत ते आज सकाळी साधुग्राममध्ये पोहोचले. गेल्या कुंभमेळ्यात त्यांना जागा मिळाली होती; मात्र यंदा भूकंपामुळे जागा मागणीचे पत्र प्रशासनाला देता आले नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्यात आलेली नाही. माधवाचार्य हे साधुग्राममध्ये भटकंती करीत असताना, त्यांना कोणीतरी मेळा अधिकाऱ्यांना भेटण्याचा सेल्ला दिला. त्यांच्याकडून दिलासा मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)