उपनगर नाक्यावरील पास केंद्र दुर्लक्षित
By Admin | Updated: October 28, 2015 22:32 IST2015-10-28T22:28:33+5:302015-10-28T22:32:37+5:30
दयनीय अवस्था : कर्मचारी, प्रवासी झाले त्रस्त

उपनगर नाक्यावरील पास केंद्र दुर्लक्षित
उपनगर : उपनगर नाका येथील शहर बस वाहतूक पास केंद्र एका टपरीमध्ये स्थापन करण्यात आले असून, सोयी-सुविधांच्या अभावामुळे महामंडळाचे कर्मचारी व प्रवासी त्रस्त झाले आहेत.
उपनगर नाका येथे प्रवाशांची मागणी व गरज लक्षात घेऊन एसटी महामंडळाने काही महिन्यांपूर्वी शहर बस वाहतूक पास वितरण केंद्राची एका टपरीमध्ये स्थापना करण्यात आली आहे. नाशिक-पुणे महामार्गाच्या रस्त्यालगत असलेल्या उपनगर एसटी बस पास केंद्रात वीजपुरवठा नसल्याने महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना विविध समस्यांना तोंड देत काम करावे लागत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अक्षरश: शर्ट काढून एसटी बसेसचे पासचे काम करावे लागत आहे. तर पासेस घेण्यासाठी येणारे प्रवासी, विद्यार्थी, कामगार, महिला, युवती आदिंनादेखील त्या पास केंद्राच्या टपरीबाहेर उन्हात ताटकळत उभे राहात पास घ्यावा लागत आहे.
महामंडळाच्या पास केंद्र टपरीची पानपट्टी किंवा दूध विक्रीच्या टपरीपेक्षा अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्या टपरीवर कुठेही महामंडळाचे नाव, महामंडळाचे पास केंद्र असा उल्लेख केलेला नाही. त्या पास केंद्राच्या टपरीवर सामाजिक, राजकीय विविध पोस्टर चिटकविण्यात आल्याने सदर टपरी ही महामंडळाचे पास केंद्र असल्याचे लक्षातच येत नाही. खासदार, आमदार व एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून उपनगर एसटी महामंडळ पास केंद्राचे नूतनीकरण करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)