अवैध वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष
By Admin | Updated: April 24, 2016 22:57 IST2016-04-24T22:53:38+5:302016-04-24T22:57:31+5:30
घोटी : दोषी वाहनचालकांवर कारवाईची मागणी

अवैध वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष
घोटी : इगतपुरी तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरातून ग्रामीण भागात जाण्या-येण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक केली जात असल्याने व स्थानिक वाहतूक पोलिसांसह जिल्हा वाहतूक शाखेचे या प्रकाराकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या बेकायदेशीर अवैध वाहतुकीला जिल्हा वाहतूक शाखेने अंकुश लावावा, अशी मागणी होत आहे.
इगतपुरी तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात लगतच्या अकोले, राजूर, शेंडीसह तालुक्यातील अन्य गावांतून मोठ्या प्रमाणात नागरिक बाजारहाटसाठी तसेच विविध कामांसाठी घोटीत येत असतात. अनेक वर्षांपासून या भागात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली असून, वाहनांच्या टपावर प्रवाशांना बसवून जीवघेणी वाहतूक केली जात असल्याने अनेक ठिकाणी अपघातही झाले आहेत. या बाबीकडे घोटी पोलीस ठाण्याने नियुक्त केलेले वाहतूक पोलीस हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, या अवैध वाहतुकीला स्थानिक पोलिसांसह जिल्हा वाहतूक शाखाही महिन्यातून एकदा कारवाईचा दिखावा करीत आहे. घोटी शहरातून बेकायदेशीर व अवैध वाहतुकीला आळा बसण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुखांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)