अवैध प्रवासी वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष
By Admin | Updated: November 2, 2015 22:16 IST2015-11-02T22:16:09+5:302015-11-02T22:16:39+5:30
अवैध प्रवासी वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष

अवैध प्रवासी वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष
इंदिरानगर : हेल्मेटची सक्ती करून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे. तर दुसरीकडे रिक्षाचालक सर्रासपणे अवैध प्रवासी वाहतूक करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई का करीत नाही, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
दिवाळीपूर्वी हेल्मेटची सक्ती करण्यात येत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. हेल्मेटची सक्ती शहरात न करता फक्त महामार्ग आणि मनपाच्या हद्दीबाहेर करावी, अशी मागणी आहे. मुंबई नाका ते पाथर्डी फाटा समांतर रस्त्यालगत दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगर, राजीवनगर, राणेनगर यांसह विविध उपनगरे आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक वसाहत आहे. अपुऱ्या बसच्या फेऱ्यांमुळे नाइलाजाने बहुतेक नागरिक रिक्षाने प्रवास करतात. रिक्षामध्ये चालकाजवळ दोन ते तीन आणि पाठीमागे सहा ते सात प्रवासी बसवून बेफान वेगाने रिक्षा धावतात. त्यामुळे लहान-मोठे अपघात घडत आहेत; परंतु अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर शहर वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाची मेहरनजर का असते, असा चर्चेचा विषय आहे. फक्त मार्च महिन्यात केसेसचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी थातूर-मातूर कारवाई करण्यात येते. त्यानंतर सर्रास अवैध प्रवासी वाहतुकीचा जणू काही परवाना देण्यात येतो. त्यांना सोडून सर्वसामान्य माणसाच्या पाठीमागे लागून हेल्मेट सक्तीसाठी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. (वार्ताहर)