कडुनिंबाची जोडफांदी बनली मृत्यूचा फास

By Admin | Updated: February 7, 2016 22:45 IST2016-02-07T22:20:20+5:302016-02-07T22:45:19+5:30

करुण अंत : झाडाच्या खोडात अडकली बिबट्याची मादी

Neem inlaid became the fossil of death | कडुनिंबाची जोडफांदी बनली मृत्यूचा फास

कडुनिंबाची जोडफांदी बनली मृत्यूचा फास

 नांदूरशिंगोटे : भक्ष्याचा पाठलाग करताना कडुनिंबाच्या खोडापाशी असलेल्या जोडफांद्यामध्ये अडकल्याने बिबट्या मादीचा करुण अंत झाल्याची घटना शुक्रवारी रात्री नळवाडी शिवारात घडली. झाडात अडकल्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन बिबट्या मादीचा मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
नळवाडी शिवारातील चिकणीरोडलगत गट नंबर १५० मध्ये सुनील एकनाथ सहाणे यांच्या मालकीच्या शेताच्या बांधावर कडुनिंबाचे झाड आहे. शनिवारी सकाळी शाळेत जात असलेल्या विद्यार्थ्यांना सदर कडुनिंबाच्या खोडात बिबट्या अडकल्याचे निदर्शनास आले होते. भयभीत झालेल्या विद्यार्थ्यांनी आरडाओरडा करीत तातडीने या प्रकाराची माहिती परिसरातील शेतकऱ्यांना दिली. शेतकऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता बिबट्या मृत झाल्याचे दिसून आले. सहाणे यांनी भ्रमणध्वनीहून सदर घटनेची माहिती वनविभाग व पोलीस दूरक्षेत्र कार्यालयास दिली.
सकाळी नऊ वाजता वनक्षेत्रपाल एम. एम. बोडके, वनपाल एस. एस. गायकवाड, वनरक्षक पी. ए. सरोदे, रुबिना पठाण आदिंसह वन कर्मचारी नळवाडी शिवारात दाखल झाले. तीन वर्षे वय असलेली ही बिबट्या मादी शुक्रवारी रात्री भक्ष्याचा पाठलाग करतांना कडुनिंबाच्या खोडालगतच असलेल्या दोन फांद्यांच्या बेचक्यात अडकली असावी. फांद्यांमध्ये अडकल्याने भीती व श्वास कोंडल्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. फांदीतून सुटका करून घेण्यासाठी केलेल्या झटापटीच्या खुणाही बिबट्याच्या अंगावर दिसून आल्या. घटनास्थळापासून मानवी वस्ती लांब असल्याने रात्रीच्या वेळेस हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही.
पंचनामा केल्यानंतर बिबट्या मादीचा मृतदेह झाडातून बाहेर काढण्यात आला. नाशिक वनविभागाचे सहायक वनसंरक्षक पी. डी. भामरे व उपवनसंरक्षक अनिता पाटील यांनीही घटनास्थळी भेट
देऊन पाहणी केली. नांदूरशिंगोटे येथील पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. ए. शेंगाळ यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यानंतर नांदूरशिंगोटे वनक्षेत्रातील गट नंबर २६५ मध्ये दुपारी चार वाजेच्या सुमारास वन अधिकारी व पंचांच्या उपस्थितीत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.



सिन्नर तालुक्यातल्या भोजापूर खोरे परिसरात नेहमीच बिबट्यांचा वावर असतो. चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी या भागात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात बिबट्याला लपण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागा आहे. याशिवाय उन्हाळाच्या दिवसांत पाण्याच्या शोधार्थ आलेले बिबटे या भागात नेहमी दृष्टीस पडतात. गत आठवड्यातच नळवाडी शिवारात बिबट्याने एका कालवडीसह कुत्र्यांचा फडशा पाडला होता. (वार्ताहर)

Web Title: Neem inlaid became the fossil of death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.