हवी जलशुद्धीकरण यंत्रणा

By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:49:46+5:302016-04-03T03:50:16+5:30

आक्षेप : रामकुंडावर बोअरवेलला विरोध; पर्यावरणप्रेमींचे निवेदन

Need Water purification system | हवी जलशुद्धीकरण यंत्रणा

हवी जलशुद्धीकरण यंत्रणा

नाशिक : पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर रामकुंडात कायमस्वरूपी पाणी ठेवण्यासाठी महापालिकेने गोदापात्रात बोअरवेल खोदण्यासंबंधी तयार केलेल्या प्रस्तावाला पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शविला आहे. महापालिकेने रामकुंडासाठी होळकर पूल ते आनंदवलीपर्यंत उपलब्ध पाणीसाठ्यातून पाणी उचलावे व त्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसवावी, असा पर्यायही पर्यावरणप्रेमींनी सुचविला
आहे.
महापालिका आयुक्तांना राजेश पंडित, देवांग जानी व नितीन शुक्ल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महापालिकेने गोपिकाबाई तास परिसरात बोअरवेल प्रस्तावित केले आहे. सदरची जागा ही खडकाळ असून तेथे मशिनरीच्या साहाय्याने बोअरवेल करणे अशक्यप्राय आहे. जवळच शंभर वर्षांहून अधिक जुना असलेला व्हिक्टोरिया पूल आहे. या पुलाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे रामकुंडात तात्पुरत्या स्वरूपात प्रवाहित पाणी सोडण्यासाठी अहल्यादेवी होळकर पुलापासून ते आनंदवली बंधाऱ्यापर्यंतच्या पाणीसाठ्याचा वापर करावा. सदरचे पाणी सोडण्यासाठी होळकर पुलाखाली तीन दरवाजे आहेत. त्यातील दोन नादुरुस्त आहेत.
सदर पाणी उचलून ते रामकुंडात जलशुद्धीकरण यंत्रणेमार्फत पोहोचविण्यात यावे. महापालिकेने मागील सिंहस्थ काळात रामकुंडानजीक जलशुद्धीकरण यंत्रणा बसविली होती; परंतु ती कार्यान्वित करण्यात आलेली नव्हती. महापालिकेने बोअरवेल न खोदता उपलब्ध पाणीसाठ्याचा कसा वापर करता येईल याबाबत विचार करावा, अशी मागणीही पर्यावरणप्रेमींनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Need Water purification system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.