दीड हजार बंद उद्योगांवर तोडगा काढण्याची गरज
By Admin | Updated: June 1, 2017 01:49 IST2017-06-01T01:49:24+5:302017-06-01T01:49:38+5:30
सातपूर : गेल्या दहा ते पंधरा वर्षांत मोठा उद्योग प्रकल्प जिल्ह्यात आलेला नाही. मात्र याच कालावधीत वर्षात जवळपास पाचशे लघु आणि मध्यम उद्योग बंद पडलेले आहेत.

दीड हजार बंद उद्योगांवर तोडगा काढण्याची गरज
गोकुळ सोनवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातपूर : गेल्या दहा ते पंधरा वर्षांत मोठा उद्योग प्रकल्प जिल्ह्यात आलेला नाही. मात्र याच कालावधीत वर्षात जवळपास पाचशे लघु आणि मध्यम उद्योग बंद पडलेले आहेत. हे बंद उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज असून, तसे झाल्यास बंद पडलेले कारखाने पुन्हा सुरू होतील, त्याचबरोबर कारखान्यांची थांबलेली चाके पुन्हा सुरू होतील.
नाशिकमध्ये बंद पडलेले उद्योग ही गंभीर समस्या आहे. चुकीचे व्यवस्थापन, वित्तीय संस्थांचे कर्ज, कामगार कलह, कर्जबाजारी, शासनाचे धोरण, युनियन व्यवस्थापन यांच्यातील वाद अशा अनेक कारणांचा समावेश आहे. असे कारखाने बंद पडून कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. बंद पडलेले कारखाने ओस पडले आहेत. अशी भकास परिस्थिती पहावयास मिळत आहे. सदरचे बंद कारखाने सुरू करण्यासाठी त्या त्या पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.
बंद उद्योग सुरू करण्यासाठी शासनाकडूनच प्रयत्न व्हावेत, यासाठी एक मागणी आहे, परंतु वेगवेगळ्या पातळीवर शासनाने अद्याप हस्तक्षेप केलेला नाही. वादग्रस्त बंद पडलेले कारखाने एमआयडीसी ताब्यात घेऊ शकत नाही, असे शासनाचे धोरण असल्याचे सांगितले जाते. परंतु ज्यांनी उद्योग सुरू करण्यासाठी भूखंड घेऊन ठेवलेले आहेत, असे भूखंड तरी नियमाप्रमाणे ताब्यात घेणे गरजेचे आहे. बंद पडलेले उद्योग आणि रिक्त भूखंड ताब्यात घेतले तरी अनेक मोठे उद्योग प्रकल्प उभे राहू शकतात.
एमआयडीसीने आतापर्यंत रिक्त भूखंडधारकांना फक्त नोटिसा बजावून कागदी घोडे नाचविण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिल्ह्यात असे किती तरी उद्योजक आहेत जे भाड्याच्या जागेत कसाबसा उद्योग चालवीत आहे. अशा उद्योजकांना जागा दिल्यास नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील.