औद्योगिक विकासासाठी पोषक कायद्यांची गरज
By Admin | Updated: May 8, 2015 23:48 IST2015-05-08T23:36:59+5:302015-05-08T23:48:29+5:30
अविनाश चिंतावार : निमाच्या वतीने कार्यशाळा उत्साहात

औद्योगिक विकासासाठी पोषक कायद्यांची गरज
सातपूर : औद्योगिक क्षेत्रासाठी लागणारे सर्व प्रकारचे पोेषक वातावरण नाशिकमध्ये आहे. तथापि, नाशिकचा औद्योगिक विकास वेगाने व्हावा यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. त्याचप्रमाणे प्रस्तावित कामगार आणि औद्योगिक कायद्यात बदल करताना हे कायदे सुटसुटीत असावे, असे मत बॉश कंपनीचे उपाध्यक्ष अविनाश चिंतावार यांनी व्यक्त केले.
निमाच्या वतीने औद्योगिक संबंधांतील आव्हाने आणि कामगार कायद्यातील प्रस्तावित बदल या विषयावरील कार्यशाळा गेट वे येथे पार पडली. यावेळी उद््घाटन कार्यक्रमात चिंतावार बोलत होते. औद्योगिक संबंध सांभाळणे ही एक कला आहे. ही जबाबदारी सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. नाशिकमध्ये औद्योगिक वातावरण चांगले आहे; परंतु शहराचा अपेक्षित विकास झालेला नाही. उद्योग क्षेत्राला लागणारे कुशल मनुष्यबळ आणि अन्य सुविधा असूनही अद्याप त्याचा उपयोग झालेला नाही. त्यामुळे त्यादृष्टीने विचार केला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
इप्कॉस कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष एच. एस. बॅनर्जी यांनी औद्योगिक विकासासाठी कामगार संघटना, उद्योजक आणि शासकीय अधिकारी एकाच व्यासपीठावर बोलवून मुक्त चर्चा झाली पाहिजे. अशा चर्चेतून सकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते. आपल्या देशात कामगार हे माफक दरात उपलब्ध होतात तरीही आपण मागे आहोत. सद्यस्थितीत असलेले कामगार आणि औद्योगिक कायदे सुस्पष्ट नाहीत ते अधिक स्पष्ट केले पाहिजेत, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक निमाचे अध्यक्ष रवि वर्मा यांनी केले. निमाच्या एच आर समितीचे अध्यक्ष मोहन पाटील यांनी औद्योगिक परिस्थिती विशद केली. मंगेश पाटणकर उपस्थित होते.