यशप्राप्तीसाठी ध्येय निश्चितीची गरज
By Admin | Updated: February 6, 2016 23:19 IST2016-02-06T23:13:31+5:302016-02-06T23:19:22+5:30
हंसराज पाटील : दृष्टी गौरव पुरस्काराने सन्मान

यशप्राप्तीसाठी ध्येय निश्चितीची गरज
नाशिक : जीवनात यश प्राप्त करण्यासाठी प्रथम ध्येय निश्चित करण्याची गरज असून, त्या ध्येयाची प्रतिमा मनात तयार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नायब तहसीलदार हंसराज पाटील यांनी केले. याच सूत्राचे अनुकरण करून आपल्या शारीरिक अपंगत्वावर मात करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करणे व शासकीय सेवेत अधिकारी पदापर्यंत पोहोचणे शक्य झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
येथील कालिदास कलामंदिर नाट्यगृहात दृष्टी प्रतिष्ठानतर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात माजी पालकमंत्री बबनराव घोलप यांच्या हस्ते ‘दृष्टी गौरव २०१६’ पुरस्कार देऊन हंसराज पाटील यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पाटील यांचे लिखित भाषण प्रतिष्ठानचे शिवाजी लोहट यांनी वाचून दाखवले. या लिखित मनोगतातून त्यांनी अपंग आणि अंध तरुणांना जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी कठीण परिश्रम घेण्याचा कानमंत्र दिला. तर दृष्टी प्रतिष्ठानच्या उपक्रमामुळे अंध व अपंगांच्या जीवनात आनंद निर्माण होणार असून, त्यांना विविध क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास बबनराव घोलप यांनी व्यक्त केला.
अंध व अपंगांच्या कौशल्य विकास कार्यक्रमासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. याप्रसंगी संजय सोनी, स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर, दृष्टी प्रतिष्ठानचे भास्कर पाटील, शिवाजी लोहट, अनिल जाधव, संजय माळी, माणिक रौैंदळ, अक्षय सोनवणे उपस्थित होते.