Need for Balmoranjan policy! | गरज बालमनोरंजन धोरणाची !
गरज बालमनोरंजन धोरणाची !

गेल्या एका दशकापासून माध्यमांमध्ये infotainment या शब्दाचा वापर वाढलेला आहे. प्रेक्षक/दर्शक किंवा श्रोत्यांपर्यंत केवळ माहिती न पोहचवता त्यातून त्यांचे रंजन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे रंजन बालकांसाठी कितपत उपयुक्त आहे याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. माध्यमांच्या संदर्भात मुबलक प्रमाणात चर्चासत्रे-परिसंवाद-परिषदा यांचे आयोजन केले जात असते. मात्र यात बाल मनोरंजनाबाबत चर्चा होताना दिसत नाही. मुख्य प्रवाहातला मीडिया बालमानसशास्त्राचा अभ्यास करून कार्यक्रमांची निर्मिती अभावानेच करतो. टीव्हीवरील जंगल बुक, पोटली बाबा की, घटोत्कच या सारख्या मोजक्या कार्यक्र मांचा अपवाद वगळता बालकांसाठी सकस मनोरंजनाचा अभावच दिसतो. हिंदी सिनेमाही यास अपवाद नाहीये. तारे जमीन पर, स्टनले का डब्बा, द ब्लू अम्ब्रेला, चिल्लर पार्टी अशा मोजक्याच आशयघन चित्रपटांची निर्मिती अलीकडच्या काळात बालकांसाठी झालेली आहे. दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला नील batte सन्नाटा हा एक दर्जेदार चित्रपट म्हणता येईल. पण यास बाल चित्रपट म्हणता येईल का याबाबत थोडी शंका वाटते. कुमारावस्थेतली शाळकरी मुलगी आणि तिच्या विधवा आईच्या नातेसंबंधाची मनोज्ञ कथा यात चितारली आहे. मराठीत लोकप्रिय (बालकप्रिय) पात्र ‘चिंटू’ यावर दोन चित्रपट तयार झाले आहेत. अलीकडच्या काळात लहान मुले केंद्रस्थानी असलेले बालक-पालक, टाईमपास आणि शाळा यासारखे चित्रपट निर्माण झाले. पण यांना निखळ बालचित्रपट म्हणणे धाडसाचे ठरेल.The Jungle Book, Minions, The Angery Birds आणि मोगली यासारखे 3Ð चित्रपटसुद्धा अलीकडे प्रदर्शित झाले आहेत. पण मोगलीचा अपवाद वगळता सारे अमेरिकन पार्श्वभूमी असलेले होते. अशा चित्रपटातून बालकांचे सकस मनोरंजन होईल अशी अपेक्षा नाही. हे चित्रपट म्हणजे टीव्ही वरील कार्टून मालिकांचेच विस्तारीत रूप म्हणता येईल.

पोगो-निक-हंगामा-कार्टून नेटवर्कं animax- Disney Land ही कार्टून chhanels बालकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. यावर सादर होणाऱ्या कार्यक्रमांमधून बालकांच्या होणा-या मनोरंजनाचा दर्जा काय नि कसा आहे, त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम काय होताहेत याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. लहान मुलांसाठी सादर होत असलेल्या कार्यक्र मांचे अशा पद्धतीने प्रक्षेपण केले जाते की , ते मोठे झाल्यावर Cosmestic चे ग्राहक बनतील. लहान मुलांमध्ये सहिष्णूता, बंधुभाव, परिपक्वता निर्माण होईल, तर्कनिष्ठ, विवेकनिष्ठ विचार करण्याची क्षमता विकसित होईल, उपभोगवादी मूल्ये थोपवली जाणार नाहीत, लोकशाही मूल्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे वस्तुपाठ मिळतील अशा प्रकारच्या कार्यक्रमांनी लहान मुलांचे मनोरंजन व्हायला हवे. आज मात्र एकसुरी, एकसाची आणि बालकांच्या वयाला न शोभणा-या कार्यक्रमांचा भडीमार बालकांवर होत आहे. कोणत्याही कार्यक्रमांमधून बालकांच्या तरल, हळूवार, निरागस, निष्पाप, निर्व्याज, निर्मळ भावविश्वाचे दर्शन फार क्वचित घडते. त्यांच्यावर अकाली प्रौढ कार्यक्रमांचा मारा होत आहे. परिणामी लहान मुलांमध्ये हिंसकपणा, चिडचिडेपणा, मन एकाग्र न होणे, शांत झोप न येणे, अभ्यासाचा ताण येणे या सारख्या समस्या निर्माण होत आहेत. बालकांचे हक्क आणि अधिकार या क्षेत्रात काम करणा-या स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, अभ्यासक, कार्यकर्ते, बालसाहित्यिक, विचारवंत या पार्श्वभूमीवर बाल मनोरंजनाबाबत राष्ट्रीय धोरण ठरविण्याची नितांत आवश्यकता आहे.

टीव्ही, इंटरनेट, व्हिडिओ गेम्स या माध्यमांमधून अतिशय हिणकस, बाजारू, अभिरु चीहीन, उग्र, उथळ आणि आक्र मक मनोरंजनाचे कार्यक्र म सादर केले जात आहेत. अशा कार्यक्रमांवर प्रतिबंध घालण्याची गरज आहे. सरकारने याविषयी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. शक्य झाल्यास बालकांसाठी दूरदर्शनने स्वतंत्र राष्ट्रीय वाहिनी सुरु करायला हवी. तसेच खासगी वाहिन्यांवर सादर होणाºया लहान मुलांच्या दर्जेदार कार्यक्रमांसाठी पुरस्कार सुरु करायला हवेत. अलीकडे लहान मुलांमध्ये वाचनाची आवड कमी झाल्याचे म्हटले जाते. पण असे असले तरी वाचनाची आवड असलेल्या कुटुंबांमध्ये मुले वाचतात. लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्याचे काम बाल मासिके करतात. मराठीत एकेकाळी लहान मुलांसाठी अनेक नियतकालिके प्रकाशित व्हायची. चांदोबासारखे ब-याच भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होणारे मासिक अलीकडेच बंद झाले आहे. पण ‘बालभारती’ कडून प्रसिद्ध होणारे ‘किशोर मासिक आपला दर्जा राखून आहे. तसेच ‘चंपक’ देखील इतर भाषांसोबतच मराठीतही प्रकाशित होत आहे. याशिवाय हिंदी आणि इंग्रजीतही बालकांसाठी विविध मासिक प्रसिद्ध होत आहेत. मराठीत तर बाल साहित्य संमेलन देखील भरवण्यात येते. मराठीतल्या जवळपास सर्वच वर्तमानपत्रात बालकांसाठी पुरवणी प्रसिद्ध केली जाते अथवा रविवारच्या पुरवणीत मुलांसाठीचे सदर चालवण्यात येते. ‘लोकमत’मध्ये तर संस्काराचे मोती हे बालकांसाठीचे सदर दररोज प्रसिद्ध होत असते. हे देखील साहित्य मुलांनी वाचावे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. बालकांचे हक्क आणि अधिकार या क्षेत्रात काम करणा-या विविध स्वयंसेवी संस्था तसेच शिक्षक व पालक यांनी दबाव गट तयार करून बालकांसाठी राष्ट्रीय मनोरंजन धोरण तयार करण्यास भाग पाडायला हवे. सध्याच्या काळाची ही नितांत गरज आहे.

(लेखक सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक असून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कार्यरत आहेत.)

Web Title:  Need for Balmoranjan policy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.