उमराणेजवळ साडेपंचावन्न लाखांचा मद्यसाठा जप्त
By Admin | Updated: February 24, 2017 23:17 IST2017-02-24T23:17:24+5:302017-02-24T23:17:50+5:30
ट्रकसह चालक ताब्यात : राज्य उत्पादन शुल्काची कारवाई

उमराणेजवळ साडेपंचावन्न लाखांचा मद्यसाठा जप्त
मालेगाव : जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचा महसूल बुडवून हरियाणा व पंजाब राज्यात निर्मिती होऊन विक्रीस आलेल्या नामांकित कंपनीचा ५५ लाख ६३ हजार ९२० रुपये किमतीचा मद्यसाठा व ११ लाख ७५ हजार रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ६७ लाख ४३ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने उमराणे शिवारातून जप्त केला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून नामांकित कंपनीचे मद्य विक्रीसाठी येत होते. राज्याचा महसूल बुडवून अलवार (राजस्थान) येथून देवळाली येथील मिलिटरी कॅम्पसाठी रामा रोडवेज प्रा. लि.च्या ट्रकमध्ये मद्यसाठा येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे दिगंबर शेवाळे, एन.आर. गुंजाळ, हवालदार दीपक पाटील, प्रवीण झाडे, प्रवीण दवणे, दुय्यम निरीक्षक किशोर गायकवाड, विजय पवार यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी उमराणे शिवारातील ढाब्यावर छापा टाकला. या ढाब्यावर उभा असलेला कंटेनरची (क्र. एचआर ६७ ए १९०५) तपासणी केली असता, त्यात नामांकित कंपनीचे ७३७ व पंजाबमध्ये निर्मिती झालेले २० बॉक्स असे एकूण ७५७ बॉक्स आढळून आले. पथकाने या प्रकरणी चालक सुकविंदर सुवर्णसिंग याची चौकशी केली असता कंटेनर राजस्थान येथून मिलिटरी कॅम्पसाठी कपडे घेऊन जात असल्याच्या बनावट पावत्या व त्या पावत्यांवर डीजीएम, बीएसई असा शिक्का मारल्याचे आढळून आले. पथकाने ट्रकसह मद्यसाठा व चालकाला ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)