१३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत

By Admin | Updated: January 20, 2017 23:57 IST2017-01-20T23:57:23+5:302017-01-20T23:57:52+5:30

मुक्त विद्यापीठ : तांत्रिक अडचणीचा विद्यार्थ्यांना फटका

Nearly 13 thousand students are in trouble | १३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत

१३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या सुमारे १३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेशअर्ज अपूर्ण असल्याने त्यांचा प्रवेश धोक्यात आला आहे. अर्ज दाखल करताना अर्जात अनेक त्रुटी राहिल्याने विद्यार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात आल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे, तर कागदपत्रे अ‍ॅटेच करूनही संगणकावर नसतील तर त्यास विद्यार्थी जबाबदार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.  सन २०१६-१७ च्या शिक्षणक्रमासाठी मुक्त विद्यापीठाने आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रवेश अर्ज दाखल केले आहेत. यातील सुमारे १३,७८० विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्णतेच्या कारणास्तव बाद करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना आता २५ तारखेपर्यंत अर्जांची पूर्तता करण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी त्यांना ३०० रुपये भरावे लागणार आहे. आॅनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रक्रिया पूर्ण केलेली असताना संकेतस्थळावर माहिती उमटत नसेल तर त्यास विद्यार्थ्यांचा दोष काय? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. अर्ज अपूर्ततेचे कारण देताना विद्यापीठाने शैक्षणिक प्रमाणपत्र अ‍ॅटेच नसल्याचे कारण सांगितले आहे तर काही विद्यार्थ्यांना अ‍ॅटेच केलेले कागदपत्र अदृश्य स्वरूपात असल्याचे म्हटले आहे. हा सर्व तांत्रिक भाग असताना विद्यार्थ्यांनी ३०० रुपयांचा भुर्दंड का सोसावा? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला आहे.  अर्जातील त्रुटी दुरुस्तीबाबतचा विनंती अर्ज, प्रवेश अर्जाची प्रोफाइल प्रत, प्रवेश पात्रतेची कागदपत्रे, बॅँक चलन आणि त्रुटींची दुरुस्ती करण्याचे शुल्क ३०० आकारण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी त्यास हरकत घेतली आहे. अर्ज पडताळणी करताना आढळेल्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे अडचणीत आलेले प्रवेश दुरुस्त करण्यासाठी विद्यापीठाने संधी दिल्याचे परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे त्रुटींची पूर्तता करण्याचे सांगण्यात आले असून, सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रतीदेखील स्पीड पोस्टाने पाठविण्याचे बंधनकारक करण्यात आल आहे. यावरून विद्यार्थ्यांनी शंका उपस्थित केली आहे.  ई-मेलने अर्जाची पूर्तता करण्याते म्हटले असतानाही पुन्हा स्पीड पोस्टाने कागदपत्रे मागविण्यात आल्यामुळे विद्यापीठाला आपल्या तांत्रिक यंत्रणेवर विश्वास नसल्याचा आरोप विद्यार्थीवर्ग करीत आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: Nearly 13 thousand students are in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.