नाशिकमध्ये मनसेच्या साथीने स्थायी समितीत राष्ट्रवादीची बाजी
By Admin | Updated: March 24, 2015 15:52 IST2015-03-24T15:47:20+5:302015-03-24T15:52:33+5:30
नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मनसेची साथ मिळाल्याने राष्ट्रवादीचे शिवाजी चुंबळे विजयी झाले आहेत.
नाशिकमध्ये मनसेच्या साथीने स्थायी समितीत राष्ट्रवादीची बाजी
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २४ - नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मनसेची साथ मिळाल्याने राष्ट्रवादीचे शिवाजी चुंबळे विजयी झाले आहे. सर्वाधिक सदस्य असूनही मनसेने निवडणुकीत उमेदवार उभा न करता राष्ट्रवादीला साथ दिल्याने नाशिकमध्ये नवी राजकीय समीकरणं तयार झाली आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये १६ सदस्य असून यामध्ये मनसेचे पाच, राष्ट्रवादीचे तीन, शिवसेना - रिपाइंचे तीन, भाजपा व काँग्रेसचे प्रत्येकी दोन व एक अपक्ष सदस्य आहेत. सर्वाधिक पाच सदस्य असतानाही मनसेने स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार उतरवला नाही. याऊलट मनसेने थेट राष्ट्रवादी पाठिंबा जाहीर केला होता. मंगळवारी स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी मतदान झाले. यात मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस व अपक्ष एकत्र आल्याने राष्ट्रवादीचे शिवाजी चुंबळे सहज निवडून आले.
भाजपा व राष्ट्रवादीच्या छुप्या युतीवरुन राज ठाकरे नेहमीच जोरदार टीका करतात. आता छगन भुजबळ यांचे वर्चस्व असलेल्या नाशिकमध्ये मनसेने राष्ट्रवादीला साथ दिल्याने विरोधकांना मनसेवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे.