काँग्रेस राष्ट्रवादीची बाजी
By Admin | Updated: January 11, 2016 22:13 IST2016-01-11T22:08:15+5:302016-01-11T22:13:07+5:30
दिंडोरी नगरपंचायत : शिवसेना-भाजपाचा दारूण पराभव

काँग्रेस राष्ट्रवादीची बाजी
दिंडोरी : दिंडोरी नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने शिवसेना भाजपाला जोरदार धक्का देत १० जागा मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळवले. सेनेला दोन तर भाजपाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. तीन अपक्षांनी तर एका जागेवर मनसे ने आपले खाते खोलले आहे या निवडणुकीत अनेक मातब्बर उमेदवारांना मतदारांनी धक्का दिला आहे तर १७ जागांमध्ये १० महिला नगरसेवक बनल्या आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करीत काँग्रेसने-१० पैकी ७ जागांवर राष्ट्रवादी कॉँग्रेसने ६ पैकी २ जागावर विजय सपांदन केला आहे. भाजपा व सेना स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरले होते. भाजपाचा १४ पैकी केवळ एकच उमेदवार निवडून आल्याने पराभवाचे धनी व्हावे लागले. तर शिवसेनेने सर्वच्या सर्व जागावर उमेदवारी केली होती.मात्र केवळ दोनच उमेदवार विजय झाल्याने, शिवसेनेचे दिंडोरी नगरपंचायतवर भगवा फडकविण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. मनसेने तीन जागेवर उमेदवारी केली होती पैकी एक जागेवर विजय मिळविला आहे, तर तीन अपक्ष उमेदवार निवडून आले आहे.अखेर दिंडोरी नगरपंचायतची सत्ता काँग्रेस-राष्ट्रवादी हाती आली आहे.
नगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष असून, काँग्रसचे मागास प्रवर्गातून विजयी उमेदवार माजी सरपंच भाऊसाहेब बोरस्ते यांच्या नावाची चर्चा होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश भोगे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांनी कानुराज बगाटे यांच्या उपस्थितीत निकाल जाहीर करून विजयी उमेदवारांना विजयाचे प्रमाणपत्र दिले. दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय शुक्ला यांचे मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता दिंडोरी नगरपंचायतसाठी पहिली निवडणूक अत्यंत चुरशीची झाली.या निवडणूकीत अनेक मात्तबरांना धक्का बसला आहे. (वार्ताहर)