छत्रपतींच्या नामांतरावरून राष्ट्रवादीची कॉँग्रेसकडून ‘कोंडी’
By Admin | Updated: July 24, 2014 00:58 IST2014-07-23T23:45:45+5:302014-07-24T00:58:43+5:30
बांधकाम समितीच्या सभेवर बहिष्कार

छत्रपतींच्या नामांतरावरून राष्ट्रवादीची कॉँग्रेसकडून ‘कोंडी’
नाशिक : स्थायी समितीवरील कॉँग्रेसचे सदस्य प्रा. अनिल पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सभागृहाला दिले जात नाही म्हणून बहिष्कारास्त्र उपसले असताना, आता त्याचेच पुढचे पाऊल म्हणून कॉँग्रेसच्या तिघा सदस्यांनी बांधकाम समितीच्या मासिक बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.
स्थायी समितीच्या अध्यक्ष जयश्री पवार आणि बांधकाम समितीच्या अध्यक्ष अलका जाधव या दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या असल्याने बहिष्कार टाकणारे कॉँग्रेसचे सदस्य आहेत. त्यामुळे कॉँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशी ठिणगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामांतरावरून जिल्हा परिषदेत पडली आहे. यासंदर्भात कॉँग्रेसचे बांधकाम समितीचे सदस्य डॉ. प्रशांत सोनवणे, अॅड. संदीप गुळवे व सोमनाथ फडोळ यांनी प्रा. अनिल पाटील यांची मागणी उचलून धरले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सर्वच पक्ष राजकारण करीत असताना व दोन-दोन सभागृहांना एकाच कर्मवीरांचे नाव असताना, ज्यांनी आपल्याला स्वराज्य मिळवून दिले त्या छत्रपतींंच्या नावालाच आज असा विलंब का केला जात आहे? त्याचे परिणाम
आगामी विधानसभा निवडणुकीत उमटू शकतात. दोनपैकी एका सभागृहाला छत्रपतींचे नाव देण्याला तसे
पाहता कोणाचाही विरोध असता कामा नये.
मात्र सातत्याने दोन वर्षांपासून एका शुल्लक नामांतराच्या मागणीसाठी सदस्यांना सभात्याग आणि बहिष्कार टाकावा लागतो हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया डॉ. प्रशांत सोनवणे यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामांतरावरून आता जिल्हा परिषदेत संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)