छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ सरसावली राष्ट्रवादी युवक काँग्रेस
By संजय पाठक | Updated: September 29, 2022 18:49 IST2022-09-29T18:48:53+5:302022-09-29T18:49:58+5:30
शाळांमध्ये वाटल्या महापुरुषांच्या प्रतिमा, भाजप महिला आघाडीने आंदोलन

छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ सरसावली राष्ट्रवादी युवक काँग्रेस
संजय पाठक, नाशिक -जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वती देवी संदर्भात काढलेल्या कथित वादग्रस्त विधानामुळे आज भाजपाच्या वतीने भुजबळ यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले तर भुजबळ यांच्या समर्थनासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरसावली असून त्यांनी शाळेमध्ये महापुरुषांच्या प्रतिमांचे वाटप केले.
आज सकाळी भुजबळ फार्म समोर भाजपाच्या महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले, त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विविध शाळेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रतिमा भेट दिल्या.
छगन भुजबळांनी दिलं स्पष्टीकरण-
"हे वक्तव्य मी ज्या दिवशी बोललो, त्या दिवशी सत्यशोधक समाजाचा आदर करण्याचा कार्यक्रम होता. मला माझे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. देशाविरोधात बोललो असतो तर ती वेगळी गोष्ट आहे. मी हेच बोललो होतो की, शाहू, फुले, आंबेडकरांनी आपल्याला शिकवले, त्यांचा आदर करायला हवा. त्यांची पूजा करायला हवी, असे माझे म्हणणे होते. आपल्याला सरस्वतीने काही शिकवले नाही, त्यामुळेच सरस्वती पूजनाचा प्रश्न येतोच कुठे. फुले, शाहू, आंबेडकर, आण्णासाहेब कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणासाठी मोठे काम केले. मीदेखील हिंदूच आहे, हिंदुंसाठी बरीच कामे केली आहेत. देवीच्या दर्शनाला देखील जातो. पण, देवीऐवजी महापुरुषांचा सन्मान होणे गरजेचे आहे," असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले.