राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मिळाले सोशल मीडियाचे धडे
By Admin | Updated: July 5, 2014 00:17 IST2014-07-04T23:43:17+5:302014-07-05T00:17:10+5:30
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मिळाले सोशल मीडियाचे धडे

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मिळाले सोशल मीडियाचे धडे
नाशिक : लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा झालेला वापर लक्षात घेऊन राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षानेही आता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनहिताचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्याचा विडा उचलला असून, त्याचाच भाग म्हणून उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना कार्यशाळेच्या माध्यमातून सोशल मीडिया वापराबाबतचे धडे देण्यात आले.
नाशिक शहर व जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया कार्यशाळा प. सा. नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुळे यांनी सांगितले, पक्ष संघटनेचे काम करत असताना, आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींचा अभ्यास करणे गरजेचे आहे. पक्षाच्या विरोधात येणाऱ्या माहितीला योग्य ते उत्तर युवा-युवतींनी दिले पाहिजे व जनहिताचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचविले पाहिजे.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर व नितीन वैद्य यांनी सोशल मीडियाचा वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून १८ ते २५ वयोगटातील युवक-युवतींना पक्षाशी जोडण्यात यावे. आपले काम करतानाच पक्षासाठी कामे करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी आहे त्या ठिकाणाहून पक्ष वाढीसाठी ई कार्यकर्ता म्हणून काम करावे, असे आवाहनही लाटकर यांनी केले. यावेळी पक्ष संघटनेसाठी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या वतीने ई कार्यकर्ता नोंदणी कार्यक्रम, विद्यार्थी कॉँग्रेसच्या वतीने सदस्य नोंदणी तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मोबाइल अॅपचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते ए. टी. पवार, विनायकदादा पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष नीलेश राऊत, प्रदेश पदाधिकारी देवीदास पिंगळे, सुनील बागुल, नाना महाले, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष अर्जुन टिळे, डॉ.
भारती पवार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)