राष्ट्रवादी कॉँग्रेसला हवेय मनगटात ‘बळ’
By Admin | Updated: January 13, 2017 00:28 IST2017-01-13T00:27:47+5:302017-01-13T00:28:11+5:30
भाजपातर्फे उमेदवारांचा शोध : अध्यक्षपदाचा शिवधनुष्य पेलण्यास सेना उत्सुक

राष्ट्रवादी कॉँग्रेसला हवेय मनगटात ‘बळ’
गणेश धुरी नाशिक
जिल्हा परिषदेत गेल्या तीन पंचवार्षिकपासून एकहाती सत्ता मिळविणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला नेतृत्वाअभावी काहीसे कमजोर झाल्याचे चित्र आहे. याचे प्रमुख कारण जिल्ह्यात राष्ट्रवादीची सत्ता येण्यामागे एकखांबी नेतृत्व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हेच असल्याचे नाकारता येणार नाही. तूर्तास ते कायदेशीर कचाट्यात सापडल्याने राष्ट्रवादीला पुन्हा सत्तेत येण्यासाठी व आगामी निवडणुकांची लढाई जिंकण्यासाठी मनगटात ‘बळ’ हवे आहे.
दुसरीकडे ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचलेले नेटवर्क आणि कार्यकर्त्यांची फौज पाहता पांडुरंग राऊत यांच्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर भगवा फडविण्यासाठी शिवसेना जोरदार मुसंडी मारण्याच्या तयारीत आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेच्या ७३ गटांमध्ये उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. अर्थात सत्ता असल्याने त्यांना उमेदवार मिळतीलही, मात्र उमेदवारीचे विजयात रूपांतर करणारे इच्छुक मिळतीलच याची शाश्वती नाही. भाजपाच्या जिल्हा नेतृत्वाने तसेही ग्रामीण भागात भाजपाला जास्त जोर द्यावा लागेल, असे याआधीही कबूल केले आहे. शंभर वर्षांची परंपरा लाभलेल्या कॉँग्रेसला मिनी मंत्रालयात खूपच खडतर आव्हानांना सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. त्यांचे १४ सदस्य असताना नाशिक महापालिकेतील मनसेप्रमाणेच जिल्हा परिषदेत कॉँग्रेसला गळती लागली आहे. माजी आमदार अॅड. अनिलकुमार अहेर यांना तर त्यांच्या घरातूनच बंधू विलास अहेर यांच्या रूपाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सामना करण्याची वेळ आली आहे. इगतपुरीत संदीप गुळवे शिवसेनेत गेल्याने आमदार निर्मला गावितांना इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातून कॉँग्रेसच्या जागा टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. माकप त्यांच्या सुरगाणा तालुक्यापुरता मर्यादित राहण्याची शक्यता अधिक आहे. नाही म्हणायला दिंडोरी, कळवण, त्र्यंबकेश्वर येथूनही माकपाला एखाद दोन जागांची अपेक्षा आहे. मनसेचे तीन सदस्य मागील पंचवार्षिकमध्ये निवडून आले होते. मात्र यंदा खाते खोलण्यासाठीही रेल्वे इंजिनाला जोर लावावा लागेल. परंतु मागील वेळेची तीन सदस्यांची पुनरावृत्ती मनसेला अवघड आहे.