राष्ट्रवादीला आत्मपरीक्षणाची गरज

By Admin | Updated: February 24, 2017 23:36 IST2017-02-24T23:36:10+5:302017-02-24T23:36:29+5:30

शिवसेनेच्या हाती सत्तेची दोरी : ग्रामीण जनतेने भाजपा, कॉंग्रेसला नाकारले

NCP needs self-examination | राष्ट्रवादीला आत्मपरीक्षणाची गरज

राष्ट्रवादीला आत्मपरीक्षणाची गरज

दत्ता महाले : येवला
माजी मंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीचा जोरदार फटका राष्ट्रवादीच्या सत्तास्थानाला बसला. येवला पंचायत समितीवर विविध गणांतील सात जागांवर विजय मिळवत निर्विवाद बहुमत सिद्ध करीत शिवसेनेचा भगवा फडकला. यानिमित्ताने तालुक्यातील जनेतेने राष्ट्रवादीला एकप्रकारे आत्मचिंतनाची गरज असल्याचा स्पष्ट कौल दिला असला तरी ग्रामीण जनेतेने भाजपा आणि कॉँग्रेसलाही नाकारले आहे. सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्यांना जनतेने नाकारले.  पंचायत समितीत राष्ट्रवादीला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. जिल्हा परिषदेच्या पाटोदा गटासह अंदरसूल गटातील अशा केवळ दोन जागा राष्ट्रवादीला राखता आल्या. शिवसेनेने नगरसूल, राजापूर आणि मुखेड गटाच्या तीन जागा मोठ्या बहुमताने काबीज केल्या. येवला पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेकडे सत्ता आली आहे. येवला नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचे दावेदार झालेल्या भाजपासह काँग्रेसला खातेदेखील उघडता आले नाही. बसपासह अन्य अपक्षांचीदेखील वाताहत झाली. यातून शिवसेनेला विकासकामे साधण्याची संधी ग्रामीण जनतेने दिली. अंदरसूलला गटात राष्ट्रवादीचे महेंद्र काले यांचा विजय झाला आणि महेंद्र काले यांचे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे कार्यकर्ते व जनसंपर्क, कामाचा माणूस म्हणून असलेली प्रतिमा आणि राष्ट्रवादीचे नेते मविप्र संचालक अंबादास बनकर यांच्या कार्यकर्त्यांचे मोहळ कामी आले. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आमदार छगन भुजबळ यांचे निष्ठावंत मकरंद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. परंतु भुजबळ समर्थकांना हे रुचले नाही. महेंद्र काले यांनी थेट खासदार सुप्रिया सुळे यांची सभा घेत आणि वातावरण निर्मिती केली. अंदरसूल गणात शेतकरी संघटनेचे पाठबळ लाभलेल्या शिवसेनेच्या निष्ठावान सर्वसामान्य उमेदवार नम्रता जगताप यांना मतदारांनी स्वीकारले.  पाटोदा गटात सेनेची करपलेली भाकरी मतदारांनी फिरवली आणि सेनेचा गड ढासळला. राष्ट्रवादीचे संजय बनकर विजयी झाले. राष्ट्रवादीचे नेते अंबादास बनकर यांनी सुयोग्य नियोजनामुळे एकहाती गट काबीज झाला. बाजार समिती संचालक संजय बनकर यांना राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोटात प्रारंभी विरोध झाला. परंतु हा विरोध करणारे पुन्हा दिसले नाहीत. मुखेड गटात प्रारंभीपासून सहकार नेते अंबादास बनकर यांचा प्रभाव आहे. परंतु राष्ट्रवादीच्या तिकीटवाटपात विद्यमान सदस्य बाळासाहेब गुंड यांचा मुखेड गटातील हटवाद त्यांना पराभूत करणारा ठरला. मोहन शेलार यांना धुळगाव गणात कामाची पावती मिळाली तर मेंगाणे यांना बनकर यांची साथ महत्त्वाची ठरली.  नगरसूल गटात सविता पवार यांचा विजय निश्चित होता. केवळ त्यांच्या मतांची आघाडी हा चर्चेचा विषय होता. नगरसूल गट हा ओबीसी महिला राखीव होता. राष्ट्रवादीला या गटात उमेदवार मिळत नव्हता.  राजापूर गटातून जिल्हा परिषदेसाठी जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या सौभाग्यवती सुरेखा दराडे यांना आव्हान देण्यासाठी उच्चपदस्थ नोकरीला अल्पविराम देत सोडून भागवत सोनवणे यांनी त्यांच्या पत्नी शकुंतला सोनवणे यांनी या गटातून निवडणूक लढवली आणि लोकांच्या हाती निवडणूक देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत इतिहासाच्या पुनरावृत्तीची अपेक्षा केली. पण ती फोल ठरली. सोनवणे यांच्या निमित्ताने राष्ट्रवादीला लढत देण्यासाठी केवळ उमेदवार मिळाला. आणि निवडणूक चांगली रण केली गेली, एवढीच राष्ट्रवादीची जमेची बाजू आहे. राजापूर गट हा प्रारंभीपासून दराडे यांची साथ करीत आला आहे.
मुखेड गटात मतदारांनी संमिश्र कौल दिला. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड यांच्या पत्नी कुसुम गुंड यांना स्वीकारले नाही. त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सेनेच्या नवख्या कमल भाऊसाहेब आहेर यांचा विजय सेनेला सुखावह ठरला आहे. राष्ट्रवादीला कायम साथ देणारा मुखेड गटावर यंदा सेनेने कब्जा केला. उमेदवारी मिळवण्यापासून गुंड यांना संघर्ष करावा लागला. प्रस्थापितांची असणारी नाराजी त्यांना भोवली.  शिवसेनेच्या उमेदवार निश्चितीपासून ते प्रचारापर्यंतच्या सर्व टप्प्यांत महत्त्वाची भूमिका बजावलेले शिवसेना नेते संभाजीराजे पवार आणि जिल्हा बँक संचालक किशोर दराडे यांना तालुक्याने स्वीकारले. नगरसूल आणि राजापूर गटात असणारे नियोजन उत्कृष्ट होते. त्यामुळे पंचायत समितीत सेनेला स्पष्ट बहुमत मिळाले. तालुक्याच्या उर्वरित गट-गणात असे नियोजन मिळाले असते. शिवाय सावरगाव गणात राष्ट्रवादीचा उमेदवार नसताना सेनेला येथे प्रचारासाठी अडकून ठेवण्यात भाग पाडले गेले. सावरगाव गण बिनविरोध झाला असता तर सेनेचे बळ आणखी वाढले असते. निष्ठावांनाना सेनेने उमेदवारी दिली असती तर विरोधी पक्ष शिल्लक राहिला नसता अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांची होती.
वारसदारांना संधी
शिवसेना नेते संभाजीराजे पवार यांच्या भावजय सविता बाळासाहेब पवार यांना नगरसूल गटातून, राष्ट्रवादीचे नेते अंबादास बनकर यांचे सुपुत्र बाजार समिती संचालक संजय बनकर यांना पाटोदा गटातून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या धर्मपत्नी सुरेखा दराडे यांना राजापूर गटातून मतदारांनी विक्र मी मतांनी विजयी करून दिले.
राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांनी पक्षांतर करून शिवसेनेत प्रवेश करून पंचायत समिती सदस्य म्हणून प्रवेश केला तर अन्य शिवसेना व राष्ट्रवादीच्या नऊ नवोदित उमेदवारांना मतदारांनी संधी तर जिल्हा परिषद गटातील पाच नवोदित उमेदवारांना जिल्हा परिषदेत पाठविणे पसंत केले.

Web Title: NCP needs self-examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.