नायगाव घाट बनला कचरा डेपो
By Admin | Updated: January 11, 2017 00:10 IST2017-01-11T00:10:02+5:302017-01-11T00:10:14+5:30
नायगाव घाट बनला कचरा डेपो

नायगाव घाट बनला कचरा डेपो
नायगाव : सिन्नर - सायखेडा रस्त्यावरील नायगाव घाट गेल्या अनेक दिवसांपासून माळेगाव औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यांचा कचरा डेपो बनल्याचे चित्र आहे. थेट रस्त्यावर कचरा टाकण्यात येत असल्याने घाटाचे विद्रूपीकरण होण्यासह वाहतुकीसही अडथळा ठरत आहे. माळेगाव एमआयडीसीतील विविध कंपन्यांकडून टाकावू वस्तू व कचरा नायगाव घाट परिसरातील टेकडीवर किंवा रस्त्याच्या कडेला सर्रासपणे टाकून दिला जात आहे. या कचऱ्याचे प्रमाणही मोठे राहत असल्यामुळे तो अनेकदा मोठ्या वाहनांमध्ये भरून आणला जातो. कधी हा कचरा पेटवून दिल्याने त्याची दुर्गंधी परिसरात पसरून प्रवाशांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागतो. या पेटविलेल्या कचऱ्यामुळे परिसरातल्या डोंगरावरील जनावरांचा चाराही जळून खाक होण्याचे प्रकार घडले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून या दोन किलोमीटरच्या परिसरात कचरा टाकण्याच्या प्रकारात सातत्याने वाढ होत असल्याने घाटाच्या नैसर्गिक सौंदर्यास बाधा निर्माण होत आहे. संपूर्ण घाट हा हिरवाईने नटलेला डोंगराच्या कुशीत नागमोडी वळणे असलेला रस्ता आणि तळाशी असलेला जलाशय व परिसरातील हिरवीगार शेतशिवार यामुळे पर्यटकांना भुरळ घालतो. याशिवाय घाटातील महादेव मंदिरामुळे येथे भाविकांची वर्दळ असते. शनिवार-रविवार तर घाट परिसर हमखासपणे पर्यटकांनी गजबजून गेलेला दिसतो. गेल्या अनेक दिवसांपासून टाकण्यात येणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्यामुळे घाटाच्या सौंदर्याला दृष्ट लागली आहे. घाटातील प्रत्येक वळणावर कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत. कचऱ्याबरोबरच अनेक कारखान्यांतून अधून-मधून सोडण्यात येणाऱ्या दुर्गंधीयुक्त धुराने परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करून घाट परिसरात दुर्गंधीमुक्त करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांसह प्रवाशांनी केली आहे. (वार्ताहर)