शहरात नवरात्रोत्सवाला रंगत; दांडियाची धूम
By Admin | Updated: October 16, 2015 22:35 IST2015-10-16T22:32:45+5:302015-10-16T22:35:22+5:30
शहरात नवरात्रोत्सवाला रंगत; दांडियाची धूम

शहरात नवरात्रोत्सवाला रंगत; दांडियाची धूम
नाशिक : नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेपर्यंत नवरात्रोत्सवाला रंगत चढली असून, शहरातील अनेक ठिकाणी गरबा दांडिया खेळला जात आहे. शहरातील देवी मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत असून, कालिका माता यात्रोत्सवाला भाविक हजेरी लावत आहेत.
यंदा नवरात्रोत्सवावर दुष्काळाचे सावट असले तरी चौथ्या माळेनंतर नवरात्रोत्सवात रंगत येत असल्याचे चित्र आहे. अनेक परंपरागत दांडिया उत्सवांना आता सुरुवात झाली आहे. अनेक मंगल कार्यालय आणि लॉन्समध्ये दांडियाचा ठेका धरला जात आहे. शहरातील गुजराथी बांधवांकडून पारंपरिक गरबा नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकरोड आणि नाशिक शहरात गुजराथी बांधव एकत्र येऊन गरबा उत्सव साजरा करत आहेत.
त्याचप्रमाणे बंगाली बांधवांच्या दुर्गा उत्सवालादेखील येत्या दोन-तीन दिवसांत सुरुवात होणार असून, गांधीनगर आणि सिडको येथील बंगाली बांधव उत्सवाच्या तयारी लागले आहेत.
ग्रामदेवता कालिका मातेचा यात्रोत्सव यंदा मोठ्या प्रमाणात भरला आहे. त्र्यंबक सिग्नल ते महामार्ग बसथांब्यापर्यंत दुकाने थाटली असून, सायंकाळी या मार्गावरील वाहतूक वळवावी लागली आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची दिवसभर रीघ सुरू आहे. विशेषत: सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीसाठी परिसरातील महिला भाविक आवर्जुन हजेरी लावत आहेत.
नाशिकरोड येथील दुर्गादेवी आणि भगूर येथील रेणुकामाता येथेदेखील मोठ्या प्रमाणात यात्रा भरली आहे. भगूरला देवी दर्शनासाठी विशेष बसचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून नाशिकरोड येथील दुर्गादेवी यात्रोत्सवात वाढ झाली आहे. यंदा यात्रेत मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली आहेत. शहरातील उपनगरांमध्ये सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांचा गरबा रंगला आहे.