मालेगावच्या बसस्थानकाला यात्रेचे स्वरूप
By Admin | Updated: September 24, 2016 22:46 IST2016-09-24T22:44:07+5:302016-09-24T22:46:14+5:30
मालेगावच्या बसस्थानकाला यात्रेचे स्वरूप

मालेगावच्या बसस्थानकाला यात्रेचे स्वरूप
मालेगाव : शहरासह तालुक्यातून हजारो मराठा समाजबांधव नाशिक येथील मराठा क्रांती मोर्चासाठी सकाळी रवाना झाले.
तालुक्यातील समाजबांधव खासगी वाहनांनी मालेगावी दाखल झाले, तर शहरातील आबालवृद्ध सकाळपासूनच मिळेल त्या वाहनाने मनमाड चौफुलीपर्यंत गेले. तेथून विविध कार्यकर्त्यांनी नाशिकला जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली होती. यात लहान मुलांसह महिलांचाही संख्या लक्षणीय होती. मराठा समाजबांधवांखेरीज इतर समाजाचे कार्यकर्तेदेखील आपला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी नाशिकला रवाना झाले. नवीन बसस्थानकातून दर तासाला नाशिकला बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे बसस्थानकाला जत्रेचे स्वरूप आले होते.
नाशिकच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीने सर्व बसेस तुडुंब भरून नाशिककडे मार्गस्थ होत होत्या. नेहमीच वर्दळीत असणाऱ्या कॅम्पात आज शुकशुकाट जाणवला. तसेच शहरातील काही दुकाने बंद असल्याने शुकशुकाट जाणवत होता. दिवसभर व्हॉट्सअॅपवर उपस्थित मोर्चेकऱ्यांच्या संख्याविषयी चर्चा सुरू होती. शाळा- महाविद्यालयांना शनिवारी सुटी देण्यात आली होती. त्यामुळे शहरासह तालुक्यांमध्ये शुकशुकाट जाणवत होता.
मूक मोर्चात सामील होण्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे काही व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद ठेवला. यात शेतकरी, शेतमजुरांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. दिवसभर नाशिक येथील मराठा क्रांती मोर्चाची चर्चा सुरू होती. सकाळपासून नागरिकांकडून मोर्चाच्या आकड्याविषयी तर्कवितर्क सुरू होते. ४० लाखांपासून ७५ लाखांपर्यंतचा अंदाज नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होता.
विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी मोर्चेकऱ्यांसाठी वाहन व्यवस्था करून दिली होती, तर इतर सर्व समाजातील नागरिक मिळेल त्या वाहनाने मराठा समाजबांधवांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दाभाडी : मराठा क्रांती मोर्चाच्या समर्थनार्थ दाभाडीत कडकडीत बंद पाळण्यात आला. संपूर्ण गावात कोणताही भेदभाव न मानता एकमुखी पाठिंबा देत दुकाने बंद ठेवण्यात आली. कोपर्डी घटनेचा निषेध नोंदवत एक दिलाने बंद पाळण्यात आला. गावातून एकूण १२० मोठ्या वाहनांतून व लहान-मोठ्या किमान दोनशेच्या आसपास वाहनांतून समाजबांधव नाशिकला रवाना झाले. कोणत्याही दबावविना स्वयंस्फूर्तीने दाभाडीकरांनी बंद पाळून मराठा क्रांती मोर्चास पाठिंबा दिला.