राष्ट्रवादी-सेनेला समान आशीर्वाद भाजपाचा ‘स्ट्रायकींग रेट’ मात्र सरस
By Admin | Updated: October 21, 2014 01:58 IST2014-10-19T23:00:47+5:302014-10-21T01:58:48+5:30
राष्ट्रवादी-सेनेला समान आशीर्वाद भाजपाचा ‘स्ट्रायकींग रेट’ मात्र सरस

राष्ट्रवादी-सेनेला समान आशीर्वाद भाजपाचा ‘स्ट्रायकींग रेट’ मात्र सरस
नाशिक : संपूर्ण जिल्ह्याच्या १५ मतदारसंघात सर्व पक्ष आणि अपक्षांनाही झालेले मतदान लक्षात घेता, शरद पवार यांच्या नेतृत्वावर फिदा असलेला जिल्हा ही ओळख जशी दृढ झाली आहे, त्याचप्रमाणे राज्याच्या सत्तेची कवाडे ज्या पक्षाच्या ‘दार उघड बये दार उघड’ या हाळीला प्रतिसाद मिळून खुली झाली, त्या शिवसेनेचा जिल्ह्यातल्या मतदारांवरील प्रभावावरदेखील शिक्कामोर्तब झाले आहे.
मतदारांनी या दोन्ही पक्षांवर सारखेच प्रेम व्यक्त करताना, त्यांच्या ओंजळीत एकूण मतदानाच्या अनुक्रमे २५.२९ आणि २४.९२ टक्के मते टाकली आहेत. दोन्ही पक्षांनी काबीज केलेल्या मतदारसंघांची संख्यादेखील समान म्हणजे चार इतकीच आहे.
सत्तेच्या राजकारणातील भाजपाच्या चंचुप्रवेशाचे श्रेयदेखील तसे पवारांचेच. १९८५च्या निवडणुकीत भाजपा उमेदवारांनी पवारांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढविली होती. या पक्षाने यंदाच्या निवडणुकीत १४ मतदारसंघांमधील एकूण वैध मतांपैकी २२.१४ टक्के मते आपल्याकडे ओढून घेतली आहेत. मात्र क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाल्यास राष्ट्रवादी आणि सेना यांच्या तुलनेत भाजपाचा ‘स्ट्रायकींग रेट’ चांगला म्हणावा लागेल. त्यांनी दोहोंच्या तुलनेत कमी मते प्राप्त करुन तितक्याच म्हणजे चार जागा खिशात घातल्या आहेत.
इंदिरा काँग्रेसच्या पदरात मतदारांनी १२.५६ टक्के मते आणि दोन जागा टाकल्या असून जितके काम तितका दाम असा उचित व्यवहार मतदारांनी केला असे म्हणता येईल.
मनसेने ११ जागा लढविल्या आणि तेथील एकंदर वैध मतांपैकी ५.१२ टक्के मते ओढून घेतली, पण तिला विधानसभेतील एकही जागा प्राप्त करता आली नाही. म्हणजे स्ट्राईकींग रेट अत्यंत गचाळ. त्या तुलनेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची कामगिरी सरस म्हणायची. या पक्षाने तीनच जागा लढविल्या व तेथील एकूण वैध मतांपैकी तब्बल १९.२ टक्के मते घेताना एक जागा पदरात पाडून घेतली.
बहुजन समाज पार्टीने सर्व जागा लढवून केवळ १.२९ टक्के मते प्राप्त केली, तर मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन या पक्षाने केवळ एकच जागा लढविली पण १२.६२ टक्के मते खेचून घेऊन मालेगावात पाय रोवण्यास सुरुवात केली असे म्हणता येईल. याचा अर्थ बसपा हा राष्ट्रीय पक्ष असूनही या जिल्ह्यात त्याला बराच मोठा पल्ला गाठावयाचा आहे. अपक्ष आणि अन्यांनी जी मते घेतली ती मात्र गंगेलाच जाऊन मिळाली.
(प्रतिनिधी)