पिंजाळ-देवनदी लिंकसाठी राष्ट्रीय पथक नाशकात

By Admin | Updated: January 8, 2016 23:47 IST2016-01-08T23:47:07+5:302016-01-08T23:47:27+5:30

सिन्नर येथे केली पाहणी

National squad for Nashville Link: | पिंजाळ-देवनदी लिंकसाठी राष्ट्रीय पथक नाशकात

पिंजाळ-देवनदी लिंकसाठी राष्ट्रीय पथक नाशकात

नाशिक : सिन्नर तालुक्यासारख्या दुष्काळग्रस्त भागासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या पिंजाळ - देवनदी लिंक योजनेंतर्गत पाच टीएमसी पाणी उचलण्याच्या प्रकल्पासाठी शुक्रवारी (दि. ८) राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाच्या (एम.डब्ल्यू.टी.ए.) अधिकाऱ्यांसह खासदार हेमंत गोडसे यांनी सिन्नर तालुक्यात पाहणी केली.
त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी शिखरावरून गोदावरी व वैतरणा या दोन नद्यांचा उगम झाला आहे. त्यातील गोदावरी पूर्वेकडे, तर वैतरणा दक्षिणवाहिनी नदी असल्याने काही अंतरावरच ठाणे जिल्ह्यातून तिचे पाणी समुद्राला मिळते. पिंजाळ आणि गारगाई या तिच्या उपनद्या आहेत. या उपखोऱ्यात पाण्याची उपलब्धता असूनही त्याचा वापर होत नसल्याने ते पाणी समुद्राला मिळते. त्यामुळे हे पाणी वळवून अथवा उचलून प्रवाही पद्धतीने अपर वैतरणा प्रकल्पात सोडण्यात येईल. तेथून ते कडवा नदीत सोडण्यात येईल. त्यानंतर बोगदा अथवा कालव्याद्वारे ते सिन्नरच्या देवनदीत टाकण्याचा पिंजाळ-देवनदी लिंक योजनेचा उद्देश आहे. देवनदी सिन्नरच्या बहुतांश भागातून प्रवाही असल्याने त्याचा या तालुक्याच्या शेती उद्योगांना मोठा लाभ होईल. तसेच या नदीत पाच टीएमसी पाणी उपलब्ध होऊन सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागाची समस्या दूर होईल. तसेच मुंबई-दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये समाविष्ट होणाऱ्या बारागावप्रिंपी, पास्ते तसेच संबंधित भागालाही त्याचा लाभ होऊ शकेल, असा प्रस्ताव खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्र सरकारला सादर केला होता. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाचे हैदराबाद येथील अधिकारी कार्यकारी अभियंता शरण्णाप्पा यांनी मेरी तसेच हायड्रोलॉजी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
सिन्नर तालुक्यात केलेल्या पाहणी दौऱ्यात जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव हेही उपस्थित होते. या प्रकल्पाच्या उपयुक्ततेचा फिजीबलिटीचा अहवाल हे पथक केंद्र सरकारला सादर केल्यावर त्याचा मान्यतेचा निर्णय घेण्यात येईल, असे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: National squad for Nashville Link:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.