राष्ट्रीय पक्ष्याचे दुर्दैव : वैद्यकीय मदत न मिळाल्याचा आरोप
By Admin | Updated: March 26, 2015 22:51 IST2015-03-26T22:50:33+5:302015-03-26T22:51:20+5:30
नागापूरला तेरा मोरांचा मृत्यू

राष्ट्रीय पक्ष्याचे दुर्दैव : वैद्यकीय मदत न मिळाल्याचा आरोप
मनमाड : येथून जवळच असलेल्या नागापूर येथे १३ मोरांचा मृत्यू झाला आहे. चार मोर मृत्युमुखी पडल्यानंतर पशुवैद्यकीय विभागाला कळवूनही वैद्यकीय पथक उशिराने पोहोचल्याने जिवाच्या आकांताने तडफडणाऱ्या नऊ मोरांना प्राण गमवावे लागल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे.
राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोर पक्ष्याच्या बाबतीत शासकीय यंत्रणेकडून गांभीर्य बाळगण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नागापूर येथे इंधन कंपनीच्या मागील बाजूस रेल्वे लाइनच्या कडेला काही मोर मृतावस्थेत असल्याची बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन या
बाबतची माहिती शासकीय यंत्रणेला कळवली. चार मोर मृत्युमुखी पडले होते तर अन्य नऊ मोर तडफडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल तीन तासांपेक्षा अधिक कालावधी लागल्याने नउ मोरांचा मृत्यू झाला. एकाच वेळी १३ मोर मृत्युमुखी पडल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एल. साबळे, डॉ. एस. बी. गोंदकर यांनी मृत मोरांचे शवविच्छेदन करून अवशेष तपासणीसाठी नाशिक येथे पाठविले.
शवविच्छेदनानंतर मोरांचे मृतदेह वन कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली असून, मोरांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला. असे असले तरी एकाच वेळी १३ मोर मृत्युमुखी पडल्याने विषबाधा झाली असावी का? संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, याबाबत पशुवैद्यकीय ैअधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अतिरिक्त आरोग्य केंद्राचा कार्यभार असल्याने घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)